‘एसआयएलसी’, ‘यिन’तर्फे  उद्योजक घडवणारा अभ्यासक्रम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क क्र. 9372230000 
व्हॉटस्‌ऍप क्र. 9372260000 
इ मेल- contact@simacesyin.com 
अधिक माहितीसाठी "सकाळ माध्यम समूहा'च्या नजीकच्या कार्यालयाशीही संपर्क साधता येईल. 

पुणे - "स्टार्ट अप'च्या माध्यमातून नव्या पिढीला नव्या कौशल्यांसह जोडून घेण्याच्या "सकाळ माध्यम समूहा'च्या प्रयत्नांचा भाग म्हणून "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर' (एसआयएलसी) आणि "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) यांच्या वतीने "सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' सुरू करण्यात येत आहे. जीवनात यशस्वी होण्याची आकांक्षा असणाऱ्या प्रत्येकाला बारा महिन्यांचा हा कार्यक्रम उपयुक्त ठरू शकेल. 

उद्योजक बनण्याची मानसिकता घडवण्यापासून ते "स्टार्ट अप'च्या माध्यमातून प्रत्यक्ष उद्योगाच्या संकल्पनांचा विकास करण्यापर्यंत आणि त्यातील निवडक कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंत "ऑनलाइन' तसेच "ऑफलाइन' पद्धतीने हा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये उपलब्ध असेल. उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने आवश्‍यक माहिती, अभ्यासक्रमस यशकथा, उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी देणारे एक साप्ताहिकही या कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञांनी थेट "ऑनलाइन' संवाद साधण्याबरोबर प्रत्यक्ष कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधीही या अभ्यासक्रमात मिळणार आहे. 

सोळा वर्षे व त्यापुढील वयाच्या व्यक्ती हा अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकतील. नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला एक "लॉग इन आयडी' देण्यात येईल. "ऑनलाइन' माध्यमाद्वारे दृकश्राव्य पद्धतीने प्रशिक्षणार्थी त्यांच्या सोयीच्या वेळेत रोज अर्ध्या तासाची गुंतवणूक करून हे प्रशिक्षण घेऊ शकतील. मोबाईल फोन वापरूनही हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्‍य आहे. 

दोन टप्प्यातील अभ्यासक्रम 
या अभ्यासक्रमाची रचना दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. छत्तीस आठवड्यांच्या पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणार्थींना दृकश्राव्य व लिखित स्वरूपात प्रशिक्षण देण्यात येईल. बारा आठवड्यांच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी प्रशिक्षणार्थींना वैयक्तिक मार्गदर्शनाबरोबर, उद्योजकतेची सुरवात म्हणून "स्टार्ट अप कॉम्पिटिशन' आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेत नव्या स्टार्ट अप उद्योगाच्या संकल्पना मांडणाऱ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यासाठी व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने साह्य करण्यात येईल. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम विकसित केला आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी 2,999 रुपये इतके प्रवेश शुल्क आहे. 

Web Title: pune news SILC YIN SIMACES