स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

- एकूण तपासलेले रुग्ण ः 13 लाख 85 हजार 830 
- राज्यातील स्वाइन फ्लूचे रुग्ण ः चार हजार 245 
- रुग्णालयातून उपचार करून घरी सोडलेले रुग्ण ः तीन हजार 322 
- रुग्णालयात दाखल रुग्ण ः 487 
- मृत्यू झालेले रुग्ण 437 

पुणे - राज्यात स्वाइन फ्लूने अत्यवस्थ झालेल्या सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यात असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे सोमवारी देण्यात आली. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून रुग्ण उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल होत असल्याने ही संख्या वाढलेली असलेल्याचे निरीक्षणही महापालिकेतर्फे नोंदविण्यात आले आहे. 

राज्यात गेल्या महिन्याभरापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पावसाळी वातावरणामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. अशा वातावरणात स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' विषाणूंचा संसर्ग वाढतो. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण आरोग्य खात्यातर्फे नोंदविण्यात आले. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच वेळेत योग्य उपचार मिळणे आवश्‍यक आहे. त्यातून रुग्णातील गुंतागुंत नियंत्रित करून या आजारातून रुग्ण पूर्ण बरे होऊ शकतो, असा विश्‍वासही सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

उपचारांना उशीर झाल्याने आणि रुग्णाला असलेल्या इतर आजारांमुळे स्वाइन फ्लूच्या उपचारातील गुंतागुंत वाढते. अशा अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर ठेवावे लागते. अशा व्हेंटिलेटर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या पुण्यात असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये 29 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले असून, नागपूर येथे पाच आणि अकोला येथील रुग्णालयात एक रुग्ण आहे. 

पुण्यातील रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूवर उपचार करण्यासाठी अत्यावश्‍यक पायाभूत सुविधा आहेत. तसेच, त्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय तज्ज्ञही उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील डॉक्‍टर करतात. त्याचा परिणाम म्हणून येथे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढलेली दिसते, असे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोंदविण्यात आले. 

Web Title: pune news swine flu