दिवंगत साहित्यिक रा. ग. जाधव यांना तावडेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुशांत सांगवे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

पुण्यातील साधना ट्रस्टच्या पत्यावर तावडे यांच्या विभागातर्फे हे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रावर तावडे यांची सहीदेखील आहे. त्यामुळे सांस्कृतिक मंत्र्यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे : मागील वर्षी निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना चक्क राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे तावडे पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

पुण्यातील साधना ट्रस्टच्या पत्यावर तावडे यांच्या विभागातर्फे हे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रावर तावडे यांची सहीदेखील आहे. त्यामुळे सांस्कृतिक मंत्र्यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तावडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की वाढदिवस हा एक असा दिवस आहे, प्रत्येक वर्षी या दिवशी आपण आयुष्याकडे वळून पाहतो. आजतागायत झालेल्या घडामोडींची, सुखदुःखाच्या क्षणांची मनाशी उजळणी करतो. आपण कठोर परिश्रम करून आजवरचा प्रवास यशस्वी केलेला आहे. अनेकांसाठी आधारवड, काहींसाठी मार्गदर्शक तर काहींसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहात. येणाऱ्या आयुष्यात आपल्याला स्वतःतील विविध पैलू उमगावेत आणि त्यातून उत्तुंग शिखरावर आपण पोहोचावेत ही मनोकामना आहे. हा वाढदिवस आपल्याला आनंददायी आणि प्रेरणादायी ठरो.

गेल्या वर्षी जाधव यांचे निधन झाल्यानंतर तावडे यांनी शोकसंदेशही पाठवला होता. त्यावेळी अनेक माध्यमांनी या शोकसंदेशाची दखल घेतली होती. अशावेळी त्यांच्याच सहीचे पत्र जाधव यांच्या पत्त्यावर जाणे अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होते आहे. याबाबत तावडे यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. या बाबीवर आता सांस्कृतिक खाते काय प्रतिक्रीया देते हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल. 

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Pune news Vinod Tawde birthday wishes to Marathi literary critic R. G. jadhav