माओवाद्यांच्या थिंक टँकला धक्का; शहरी नक्षल्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

नागपूर विद्यापीठात प्राध्यापिका असलेल्या शोमा सेन या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नक्षलवादीसमर्थक साईबाबा याच्या निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. शोमा यांच्या पतीला याआधी गुजरात पोलिसांनी अटक केली होती. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

नागपूर : कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणात एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि दिल्ली येथून रॉना विल्सन यांना आज बुधवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. तर, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिका शोमा सेन यांची सध्या चौकशी सुरू असून घराची झडती घेतली जात आहे.

ढवळे यांना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईतील गोवंडीमधून, सुरेंद्र गडलिंग व महेश राऊत यांना नागपुरातून आणि दिल्ली येथून रॉना विल्सन यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या चार पथकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

१ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ही कारवाई झाल्याचे बोलले जाते. पण यासोबतच दलित संघटनांमध्ये हिंसक माओवीदी विचार पेरण्याची जी मोहीम माओवाद्यांकडून केला जात आहे, त्याचा पर्दाफाश यानिमित्ताने झाला आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या थिंक टँकला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे. 

दोन महिन्यांपूर्वीच पुणे पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी छापे घातले होते. यात नागपुरमधील वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर आणि कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली होती. तर, पोलिसांनी सुधीर ढवळे त्यांच्या सहकारी हर्षाली पोतदार यांच्या निवासस्थानाची व दिल्लीत विल्सन याच्या निवासस्थानी झडती घेतली होती. याशिवाय पुण्यातील कबीर कला मंचच्या ज्योती जगताप, रमेश गायचोर, ढवळा ढेंगळे, सागर गोरखे यांच्या घराची झडती घेतली होती. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन रोना विल्सनला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. रोना विल्सन मुळचा केरळचा. नक्षली थिंक टँकचा सध्या मुख्य. साईबाबाला अटक झाल्यानंतर त्याच्याकडे जबाबदारी आली.... सध्या दिल्लीत राहतो.

महेश राऊत याच्या नागपुरातील निवासस्थानी तपास करण्यात आला. राऊत मुळचा गडचिरोलीचा. नक्षली चळवळीत जंगलातील माओवादी व शहरी माओवादी यांच्यातील निरोपांची देवाणघेवाण करणारा. यापूर्वी पाच वर्षांपूर्वी त्याला हर्षाली पोतदारसोबत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

नागपूर विद्यापीठात प्राध्यापिका असलेल्या शोमा सेन या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नक्षलवादीसमर्थक साईबाबा याच्या निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. शोमा यांच्या पतीला याआधी गुजरात पोलिसांनी अटक केली होती. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

Web Title: Pune Police busted Maoist thik tank four arrested in Koregaon Bhime riot case