डाव्यांवर "रेड' 

डाव्यांवर "रेड' 

पुणे - प्रतिबंध घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या पथकाने आज पहाटे मुंबई, हैदराबाद, रांची, दिल्ली, फरीदाबाद या पाच शहरांमध्ये सहा जणांच्या घरांवर एकाच वेळी छापे घातले. त्यामध्ये नामवंत कवी वरवरा राव यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली, तर एकाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, माओवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या "थिंक टॅंक'वरील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. 

शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद घेण्यात आली होती. त्यातील चिथावणीखोर भाषणामुळेच दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराची घटना घडल्याचा पोलिसांना संशय होता. एल्गार परिषदेमध्ये बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या समर्थकांचा सहभाग होता, परिषदेच्या आयोजनामागील सूत्रधार हे प्रमुख माओवादी नेते होते. त्यांनीच या परिषदेला अर्थपुरवठा केल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सुधीर ढवळे, प्रा. शोमा सेन, रोना विल्सन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांना अटक केली होती. त्यांच्याकडून काही पत्रके व लॅपटॉप जप्त केला होता. सर्व जण बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

ढवळे, विल्सन, गडलिंग, राऊत यांच्या चौकशीदरम्यान त्यांच्यामध्ये झालेल्या दोनशे ते अडीचशे ई-मेलची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये तेलंगणमधील कवी वरवरा राव, मुंबईतील वेरनोन गोन्साल्वीस, ठाण्यातील अरुण परेरा, छत्तीसगड येथील सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा यांच्या नावांची माहिती पोलिसांना मिळाली होती. ढवळे, सेन, विल्सन, गडलिंग व महेश राऊत यांनी वेळोवेळी ई-मेलद्वारे गोन्साल्वीस, परेरा, राव, भारद्वाज व नवलाखा यांच्याशी संपर्क साधल्याचे पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले होते. 

एल्गार परिषदेचा तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने आज पहाटे एकाच वेळी देशभरात विविध ठिकाणी छापे घातले व राव, गोन्साल्वीस, परेरा, भारद्वाज व नवलाखा यांना अटक केली. 

एल्गार परिषदेमध्ये बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून पाच जणांना अटक केली आहे. माओवादी चळवळ जिवंत ठेवण्यात यांचा मोठा सहभाग होता. विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याअंतर्गत संबंधितांना अटक करण्यात आली आहे. 
- शिवाजी बोडखे, सहपोलिस आयुक्त 

येथे छापे 
मुंबई, हैदराबाद, रांची, दिल्ली, फरीदाबाद 


यांच्यावर कारवाई 
* वरवरा राव - नामवंत कवी, लेखक. यापूर्वी 1973, 1975, 1986मध्ये माओवाद्यांशी संबंधांवरून अटक झाली होती. "विरासम' या क्रांतिकारी लेखक संघटनेचे ते संस्थापक आहेत. 
* अरुण परेरा - यापूर्वी एका गुन्ह्यामध्ये अटक व सुटका. सध्या वकिली करीत आहेत. 
* वेरनोन गोन्साल्वीस - यापूर्वी एका गुन्ह्यात सात वर्षे शिक्षा, त्यानंतर सुटका. 
* गौतम नवलाखा - काश्‍मिरी फुटरतावाद्यांशी संबंध असल्याचा संशय. 
* सुधा भारद्वाज - छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्त्या, छत्तीसगड मुक्ती मोर्चाशी 1986पासून संबंधित. छत्तीसगड पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिजच्या (पीयूसीएल) सध्या सरचिटणीस. 


यांच्याही घरी छापे 
छत्तीसगडमधील रांचीतील सुसान अब्राहम, क्रांती टेकुला, फादर स्टॅन स्वामी आणि गोव्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या निवासस्थानीही पोलिसांचे छापे. स्टॅन स्वामी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. छाप्याच्या वेळी तेलतुंबडे निवासस्थानी नव्हते. 


पत्राशी संबंध? 
राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे बड्या राजकीय नेत्याला संपविण्याबाबतचे पत्र सुमारे दोन महिन्यांपूर्वी "व्हायरल' झाले होते. त्यावरून देशभर गोंधळ उडाला होता. या पत्राबाबतची कोणतीही माहिती पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, माओवाद्यांकडूनच ते पत्र फुटल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com