पुणे विद्यापीठातील वसतिगृहासाठी  विद्यार्थ्यांना द्यावे लागणार हमीपत्र 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात प्रवेश हवा असेल, तर कोणत्याही असामाजिक, जातीय, देशविघातक वा कायदा-सुव्यवस्थेला हमी पोचेल, अशा कृत्यांमध्ये सहभागी होणार नसल्याचे हमीपत्र आता विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात प्रवेश हवा असेल, तर कोणत्याही असामाजिक, जातीय, देशविघातक वा कायदा-सुव्यवस्थेला हमी पोचेल, अशा कृत्यांमध्ये सहभागी होणार नसल्याचे हमीपत्र आता विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. 

विद्यापीठातील वसतिगृहाबाबत यापूर्वी नियमावलीच होती; परंतु नव्या विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार वसतिगृह नियंत्रण नियम (रेग्युलेशन) तयार केले आहेत. त्यामुळे या नियमांना कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झाले आहे. त्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली. 

विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी हे नियम लागू असतील. नियमनाच्या या दस्तऐवजामध्ये वसतिगृहाची प्रवेश पद्धती, आचारसंहिता, नियमभंग झाल्यास होणारी कारवाई अशा अनेक बाबी निश्‍चित केल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. विद्यार्थी किती वर्षे वसतिगृहात राहू शकतो, याचा कालावधी निश्‍चित केला आहे.

वसतिगृह नियंत्रण नियमावलीनुसार वसतिगृहाचे प्रवेशद्वार पहाटे सहा ते रात्री साडेदहापर्यंत खुले राहील. रात्री उशिरा परतायचे असेल, तर त्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे; अन्यथा दंड आकारला जाणार आहे. वसतिगृहाच्या खोलीत रेडिओ, टेपरेकॉर्डर वापरण्यास बंदी घातली आहे. या नियमाचा भंग केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. 

पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दोन वर्षे, एमफिल करणाऱ्याला दीड वर्षे, पीएच.डी करणाऱ्याला चार वर्षे; तर एमफिलनंतर पीएच.डी करणाऱ्याला तीन वर्षे वसतिगृहात वास्तव्य करता येईल. कोणतेही अनधिकृत कार्यक्रम वसतिगृहात करता येणार नाहीत.

...तर प्रवेश रद्द होणार 
एखाद्या विद्यार्थ्याचा ओळखीचा विद्यार्थी वा मित्र (पॅरासाइट) वसतिगृहात अनधिकृतपणे राहतो, असे प्रकार करता येणार नाहीत. असे आढळल्यास विद्यार्थ्याला दोन हजार रुपयांचा दंड आणि त्याचा वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. वसतिगृह नियंत्रण नियमावली पाच पानी असून, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ती दिलेली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University Hostel Admission new Rules Alert