शेवटच्या दिवसापर्यंतची तूर खरेदी करावी - पासवान

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - तूर खरेदीसाठी दिलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 22 एप्रिलपर्यंत राज्यातील खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सर्व तुरीची खरेदी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्याकडे सोमवारी केली. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पासवान यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली येथे पासवान यांची भेट घेतली. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री सी. आर. चौधरी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी या वेळी उपस्थित होते.

राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे प्रामुख्याने दोन मागण्या केल्याची माहिती देऊन फडणवीस म्हणाले, 'राज्यातील तूर खरेदीसाठी देण्यात आलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी केंद्रांवर आलेल्या शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करावी. खरेदी केंद्रांवर आलेले शेतकरी आणि तूर यासंदर्भातील नोंदी सरकारकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव मिळण्याबरोबरच बाजारामध्ये बाहेरील तूर येऊ नये, यासाठी तुरीवरील आयात शुल्कात 10 टक्‍क्‍यांवरून 25 टक्के एवढी वाढ करण्याची मागणीदेखील केंद्राकडे करण्यात आली.''

तूर पिकाचे उत्पादन कमी-जास्त झाल्यास त्याची बाजारात कमतरता जाणवून त्याचा परिणाम भाववाढीत होतो. तूर दरात स्थिरता यावी, यासाठी दीर्घकालीन धोरण ठरविण्यासंदर्भातदेखील चर्चा करण्यात आली, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. राज्य सरकारने राज्यातील तूर पिकाच्या उत्पादनवाढीसाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदा एकशे दहा लाख क्विंटलहून अधिक तुरीचे उत्पादन झाले. या तुरीच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीने राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी करण्यात आली. जास्तीत जास्त तुरीची खरेदी होण्यासाठी राज्याने केलेल्या विनंतीला अनुसरून केंद्राने सातत्याने मुदतवाढ दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

Web Title: Purchase of tur from the last day should be purchased