जिभांना लगाम घाला - शिवसेना

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

बडोले यांचे विधान योग्य आहे असे आठवले म्हणतात. बडोले हे भाजपचे तर आठवले हे त्यांचे मित्रपक्ष. याचा अर्थ असा की, मराठा समाजाच्या मोर्चावर लाखोंची उधळपट्टी होत असल्यानेच ते यशस्वी होत आहेत. राजकारणात पैशांचे महत्त्व वाढले आहे व आता फक्त निवडणुकांतच पैसे लागतात असे नाही, तर पक्षांची आंदोलने करायलाही पैसे लागतात. हे सत्य असले तरी फक्त पैसे खर्च केल्यानेच त्यांचे मोर्चे यशस्वी होत आहेत असे सरसकट विधान करणे अन्यायाचे आहे.

मुंबई - मोर्चे म्हणजे पैशांचा खेळ आहे असे राज्याच्या एका मंत्र्याने सांगणे बरोबर नाही. महाराष्ट्राचे मंत्री बडोले यांनी जे विधान केले त्यामुळे भाजपची पंचाईत झाली. वास्तविक, महाराष्ट्राला आता खरी गरज आहे ती जिभांना लगाम घालण्याची. कारण त्या जेवढ्या सैल तेवढा सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका जास्त असतो. महाराष्ट्रात सध्या निघणारे मोर्चे हा आक्रोश आहे व फक्त पैसे खर्च केल्यानेच आक्रोशाला तोंड फुटते हे आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने मांडली आहे. 

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी नुकतेच पैसेवाल्यांचे मोर्चे मोठे होत असल्याचे अप्रत्यक्ष टीका मराठा क्रांती मूक मोर्चावर केली होती. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता शिवसेनेनेही आपल्या सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजपच्या मंत्र्यांला लक्ष्य करत जीभेवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 

शिवसेनेने म्हटले आहे, की महाराष्ट्रात नवी राजकीय घडी बसल्यापासून राज्याची सामाजिक घडी विस्कटली आहे काय? हा विचार जोर धरत आहे. जनता जोरात रस्त्यावर उतरली आहे व सरकारचे मन अस्थिर आहे. जनता रस्त्यावर उतरली आहे म्हणजे राज्यातील जाती रस्त्यावर उतरून आपापली ताकद दाखवू लागल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात मराठा समाजाचा मोर्चा यशस्वी झाला. त्याआधी कोल्हापूरचाही झाला. त्याचवेळी नेमक्या विरुद्ध मागण्यांसाठी दलित व इतर बहुजन समाजाचे मोर्चे निघाले, पण मराठा क्रांती समाजाचे मोर्चे विराट होते. यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी असे विधान केले की, ‘‘पैसेवाल्यांची आंदोलने व मोर्चे यशस्वी होत आहेत.’’ बडोले यांनी हे विधान करून मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. कारण बडोले यांच्या विरोधात मराठा समाजाचे लोक खवळून उठले आहेत. बडोले यांच्या विधानास रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला. बडोले यांचे विधान योग्य आहे असे आठवले म्हणतात. बडोले हे भाजपचे तर आठवले हे त्यांचे मित्रपक्ष. याचा अर्थ असा की, मराठा समाजाच्या मोर्चावर लाखोंची उधळपट्टी होत असल्यानेच ते यशस्वी होत आहेत.

राजकारणात पैशांचे महत्त्व वाढले आहे व आता फक्त निवडणुकांतच पैसे लागतात असे नाही, तर पक्षांची आंदोलने करायलाही पैसे लागतात. हे सत्य असले तरी फक्त पैसे खर्च केल्यानेच त्यांचे मोर्चे यशस्वी होत आहेत असे सरसकट विधान करणे अन्यायाचे आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जन्मदिनी व महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लाखो दलित बांधव एकवटतात ते काही पैसे देऊन आणले जात नाहीत. मुंबईतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लाखो लोक एका शिस्तीने पायी चालतात, तेसुद्धा त्यांच्या खिशात कोणी नोटा कोंबतात म्हणून नव्हे. पंढरीच्या वारीतही लाखो वारकरी एका शिस्तीने मार्ग चालीत असतात. ही श्रद्धा असते व तेथे पैशाच्या मोहाने कुणी येत नाही. त्यामुळे पैसेवाल्यांचीच गर्दी होते हे मराठा मोर्चाबाबतचे विधान आम्हाला मान्य नाही. मराठा समाजाचे मोर्चे यशस्वी होतात याचे मुख्य कारण पैसा नसून शिस्त, माध्यमांचा नेटका वापर, यंत्रणा राबविणारा हात व मुख्य म्हणजे मनात उसळलेला संताप असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

Web Title: Put curb on tongues, Shivsena advises bjp