‘समृद्धी’च्या वेगावर प्रश्‍नचिन्ह

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी १२० किलोमीटर राखण्याचे निश्‍चित होत आहे. हा वेग भारतीय वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने झेपणार का? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अलीकडेच झालेल्या रस्ते सुरक्षा आढावा बैठकीत केल्याचे समजते.

ताशी १२० किलोमीटर वेगमर्यादेच्या दृष्टीनेच या प्रकल्पाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे; पण भारतात बनवण्यात येणाऱ्या वाहनांचे डिझाईन पाहून वेगमर्यादा निश्‍चित करण्याची सूचनाही या वेळी रावते यांनी केली. समृद्धी महामार्ग ७०० किलोमीटरचा असून मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ताशी ८० किलोमीटर इतका कमाल वेग निश्‍चित केलेला आहे.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत समृद्धी महामार्गावरील रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आढावा घेऊन वेगमर्यादेत आवश्‍यक असल्यास बदल केला जाईल, अशी भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली.

फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ रोजी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. हा प्रकल्प जानेवारी २०१८ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते; मात्र भूसंपादन आणि स्थानिक गावांचा विरोध असल्याने या प्रकल्पाला उशीर झाला आहे. प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्‍याम मोपालवर यांची नियुक्ती केली आहे. येत्या दोन महिन्यांत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

घाटांसाठी समिती
आंबेनळी घाटात नुकत्याच झालेल्या बस दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर घाटांमधील वाढते अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषदेने घेतला आहे. यात विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आदींचा समावेश असेल. ही समिती सहा अहवाल देईल.

दृष्टिक्षेपात ‘समृद्धी’
४६००० कोटींचा एकूण खर्च.
१० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार. 
मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर आठ तासांत. 

Web Title: question mark on the samruddhi highway