आम्ही चालवू हा पुढे वारसा !

Smita Patil
Smita Patil

आर. आर. आबांच्या वारसदार म्हणून त्यांची कन्या स्मिता पाटील यांना पक्षाने प्रोजेक्‍ट केलेले दिसते. तासगाव-कवठेमहाकांळ मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळेल की नाही हा जर तरचा प्रश्‍न. इतके मात्र खरे वारसदाराचे राजकारण सुरूच राहणार आहे. त्यामध्ये कधी खंड पडेल असे वाटत नाही. 

कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर भाजप, कम्युनिस्ट, समाजवादी वैगेरे वगैरे पक्ष अगदी पहिल्यापासून सडकून टीका करीत आले. प्रत्येक निवडणुकीत घराणेशाही हा मुद्या ठेवणीतला. कॉंग्रेसच्या घराणेशाहीची ही कीड आता सर्वच पक्षांना लागलेली दिसते. त्यामुळेच की काय सध्या कॉंग्रेसविरोधक या मुद्यावर फारसे बोलायला तयार नसतात. संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतलेले किरीट सोमय्या हे स्वपक्षावर जेव्हा हाच आरोप होतो तेव्हा त्यांचे दर्शन कोणालाच होत नाही. मीडियावाले शोध घेऊन घेऊन थकतात पण सापडता सापडत नाही. तसेच घराणेशाहीविषयी झाले आहे. 

कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर कोणी बोलले की कॉंग्रेसवालेही विरोधकांच्या घराणेशाहीची यादीच वाचायला सुरवात करतात. त्यामुळे भारतीय राजकारणात घराणेशाहीवर किस काढण्यात काही अर्थ नाही. जशी प्रत्येक राज्यात घराणेशाही आहे तशीच ती जिल्ह्यातही, तालुक्‍यात आणि गावातही असतेच. प्रत्येक घराणेशाहीला आपला मुलगा, मुलगी वारसदार व्हावे असे वाटते. आपला वारसदार कोण ? हे नेतेही कधी स्पष्टपणे जाहीर करीत नाहीत. पण, अप्रत्यक्षरीत्या आपला वारसदार कोण याचा संदेश बरोबरच जेथे द्यायचा तेथे देतात. उत्तरप्रदेशात नाही का अखिलेश यादव हे नेताजींचे वारसदार म्हणून पुढे आले. पण आजही त्यांचा वारसदार कोण हे काही स्पष्ट होत नाही. भाऊ, मोठा मुलगा, मधला मुलगा की लहान मुलगा अशी नावे आता पुढे येताना दिसतात. घरातच संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेतही घराणेशाही आहेच. या सर्वपक्षांतील वजनदार नेत्यांचा मुलगा,मुलगी, पुतण्या, जावई सत्तेच्या सावलीत आहेतच. मात्र दुसरी एक गोष्ट अशी की जे नावाजलेले नेते आहेत त्यांच्या कन्याही राजकारणाच्या पटलावर सक्रिय आहेत. 

पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, वर्षा गायकवाड आदींसह कोणी आमदार-नामदार, खासदार तर कोणी सरपंच, नगराध्यक्षही. "राष्ट्रवादी‘चे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांची ज्येष्ठ कन्या स्मिता पाटील यांच्यावरही पक्षाने आता राज्य युवती संघटनेची जबाबदारी सोपविली आहे. आबांनी महाराष्ट्र गाजविला. त्यांचे राजकारण, भाषणे, मंत्री होणे, राजीनामानाट्य या सर्व चढउताराच्या त्या साक्षीदार आहेत. अगदी कमी वयात वडिलांचा झंझावात त्यांनी पाहिला आणि अनुभवला. पुढे त्यांचा गंभीर आजार आणि इहलोकी जाणे. अचानक दु:खाचे वादळ घोंघावत आले असताना आजी, आई, लहान बहीण, भावाला खंबीरपणे आधार देताना त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि मन हेलावूनही गेले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा विचारही झाला. पण वय कमी पडले. अन्यथा त्याच आबांच्या वारसदार बनल्या असत्या. सर्वांत तरुण आमदार म्हणून त्यांच्या नावाची नोंदही झाली असती. पण, सुमनताईंना मैदानात उतरवावे लागले.ज्या आबांसाठी त्या गावागावात मत मागण्यासाठी जात होत्या. पुढे आईसाठीही त्यांना मताचा जोगवा मागावा लागला. या सर्व चढउतारात त्या कमी वयात ताऊनसुलाखून निघाल्या. असो. 

युती सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पुढील तीन वर्षे अजून शिल्लक आहेत. या तीन वर्षात पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याने पुढील निवडणुकीत त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आबांच्या वारसदार म्हणून त्यांनाच प्रोजेक्‍ट केले जाईल असे दिसते.त्यांना उमेदवारी मिळेल का ? त्या जिंकून येतील की नाही ही त्या त्या वेळची समीकरणे असतील. आज तासगाव-कवठेमहाकांळ मतदारसंघाचा विचार केल्यास येथे खासदार संजय पाटील, अजित घोरपडे हे ही वजनदार नेते आहेत. तरीही आबांच्या नावाचे वलयही नाकारता येणार नाही. युवा नेत्या म्हणून त्या महाराष्ट्रात कशा छाप पाडतात हे पाहावे लागेल.ज्या अर्थी पक्षाने त्यांची निवड केली आहे. त्यामागे काही तरी समीकरण असणारच. आबांच्या वारसदार म्हणून त्या पुढे येतात की त्यांचा मुलगा रोहित हे पाहावे लागेल. इतके मात्र खरे की, वारसदाराचे राजकारण सुरूच राहणार आहे. त्यामध्ये कधी खंड पडेल असे वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com