यंदा रब्बीचे काही खरे नाही...

यंदा रब्बीचे काही खरे नाही...

बारामती - जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार हेक्‍टरचे क्षेत्र असलेल्या रब्बी पिकांचा यंदा डिसेंबरपूर्वीच चोळामोळा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात सध्या केवळ ५७ हजार हेक्‍टर म्हणजे १४ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्याही दोन फूट उंचीएवढ्या होत नाहीत, तोच जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. हे पाहता शेतकऱ्यांनी त्यांचीही आशा सोडून दिली आहे.

जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर या तालुक्‍यांमध्ये यावर्षी पावसाळ्यात पाऊस बरसलाच नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने या पाच तालुक्‍यांत दुष्काळाचे सावट तीव्र बनले. आता त्यात जुन्नर तालुक्‍याची भर पडली. सध्या जेवढ्या पेरण्या झाल्या आहेत, त्यांचेही भविष्य अंधारात आहे. रब्बीतील कडधान्य, ज्वारी, गव्हापासून हरभऱ्यापर्यंत साऱ्या पिकांची सध्याची स्थिती अतिशय दयनीय आहे. विशेषतः इंदापूर, बारामती, दौंड व पुरंदरच्या काही भागात शेतकऱ्यांनी धूळवाफेवर व थोड्या ओलीवर केलेली पेरणी आता वाया गेल्यात जमा आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत रब्बी ज्वारीची ४६ हजार ४०० हेक्‍टरवर पेरणी झाल्याचा आकडा कृषी विभागाकडे जमा झाला आहे. त्याचप्रमाणे मका ६ हजार २४२ हेक्‍टर, हरभऱ्याची २ हजार २५५ हेक्‍टर, रब्बी तृणधान्याची २१९ हेक्‍टर अशी वेगवेगळ्या पिकांची काही ठिकाणी पेरणी झाली आहे. 

सर्व पिकांची मिळून एकूण ५७ हजार हेक्‍टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. मात्र प्रत्यक्ष क्षेत्रावरची परिस्थिती बिकट आहे. यंदा रब्बीचे काही खरे नाही, असे शेतकरी सांगू लागले आहेत. वासुंदे (ता. दौंड) येथील एकनाथ हाजबे यांनी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने पिकांचा प्रश्नच नाही, आता सारी शिवारे मोकळी पडली आहेत, असे सांगितले.

यावर्षीचा दुष्काळ आतापर्यंतचा सर्वांत तीव्र असेल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्याचा प्रत्यय सध्याच्या पिकांवरून येत आहे. यापूर्वीही काही वेळा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला, मात्र एक ते दोन पावसांच्या ओलीवर रब्बी पिके हातात आली. आता ज्वारीची कणसे सोडा, बाटूकही हातात येणार नाही, अशी स्थिती आहे. दोन फुटांवरच त्यांची वाढ खुंटली असून तीही रोपे आता जळून चालली आहेत. त्याकडे हतबलतेने पाहण्याखेरीज शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेले नाही. केवळ बागायती भागातील गव्हाच्या लागवडी होतील, अशी सध्या आशा आहे.

टॅंकरची मागणी वाढेल
जिल्ह्यात सध्या १५ टॅंकर सुरू आहेत, मात्र अनेक गावे आता टंचाईच्या तोंडावर आहेत. पिण्याच्या पाण्याची भ्रांत असलेल्या गावांमध्ये अजूनही टॅंकर सुरू नाहीत. नोव्हेंबरमध्येच या गावांची पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. डिसेंबरपासून टॅंकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीती इंदापूर व बारामती तालुक्‍यातील पंचायत विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. 

जिल्ह्यातील पिकांचे सरासरी क्षेत्र - ३ लाख ९१ हजार हेक्‍टर
रब्बीचा आतापर्यंतचा पेरा - ५७ हजार हेक्‍टर
पेरणीची एकूण टक्केवारी -  केवळ १४
अर्थात ही आकडेवारी कागदोपत्री, प्रत्यक्षातील परिस्थिती भीषणच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com