शिवसेनेने सत्तापालट करावे -विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पंढरपूर - शिवसेनेने आपल्या मंत्र्यांचे खांदेपालट करण्याऐवजी सत्तेचे खांदेपालट करावे. शेतकरीविरोधी असलेल्या या सरकारला सत्तेतून बाहेर काढावे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आमच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे थेट आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी केले. 

पंढरपूर - शिवसेनेने आपल्या मंत्र्यांचे खांदेपालट करण्याऐवजी सत्तेचे खांदेपालट करावे. शेतकरीविरोधी असलेल्या या सरकारला सत्तेतून बाहेर काढावे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आमच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे थेट आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी केले. 

शेतमालाला हमीभाव मिळावा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या वतीने सरकारविरोधात संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज पंढरपुरात आली होती. यात्रेदरम्यान येथे शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी विखे पाटील बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, प्रणिती शिंदे, भारत भालके, कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. 

विखे पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी म्हणून शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. तरीही सरकारने कर्जमाफी केली नाही. आज शिवछत्रपतींचा स्मृती दिन आहे. याचदिवशी शिवसेनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारमधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवून आमच्या सोबत संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे; परंतु सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेले हे कसले बाहेर पडणार, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारने कर्जमाफी द्यावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे, असे सांगत सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका केली. 

"विठ्ठला, सरकारला कर्जमाफीची सुबुद्धी दे' 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्‍मिणीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर देवाला कोणते साकडे घातले, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ""संघर्ष यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरला येण्याचा योग आला. आम्ही सर्वांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. या वेळी विठ्ठलाला या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची सुबुद्धी दे असे साकडे घातले.'' 

Web Title: Radhakrishna Patil had appealed directly to President Uddhav Thackeray