LokSabha 2019 : 'राष्ट्रवादीकडून लढा' हे राहुल गांधी यांचे विधान धक्कादायक : राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुखावलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शनिवार) माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. 'राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्‍न असल्यामुळे लगेच पक्ष सोडू नका', असा सल्ला भाजपने विखे पाटील यांना दिला होता. 'आधी मोकळेपणाने बोलता येत नव्हते; आता बोलता येऊ लागले आहे', अशा शब्दांत भावना व्यक्त करत विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेस सुरवात केली. 

नगर : 'तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढा', असा सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देणे धक्कादायक होते', असा खुलासा माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शनिवार) केला. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुखावलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शनिवार) काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

विखे पाटील यांनी आज लोणी प्रवरा येथे पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. 'जुनी प्रकरणे पुढे येतील म्हणून सहकाऱ्यांनी गप्प बसणं पसंत केलं; पण मी कधी गप्प बसलो नाही', असे ते म्हणाले. राज्यातील समर्थकांशी चर्चा करून पुढील राजकीय निर्णय घेईन, असेही विखे पाटील यांनी जाहीर केले.

'राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्‍न असल्यामुळे लगेच पक्ष सोडू नका', असा सल्ला भाजपने विखे पाटील यांना दिला होता. 'आधी मोकळेपणाने बोलता येत नव्हते; आता बोलता येऊ लागले आहे', अशा शब्दांत भावना व्यक्त करत विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेस सुरवात केली. 

नगरच्या जागेवरून विखे पाटील आणि काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यासंदर्भात विखे पाटील यांनी आज प्रथमच भाष्य केले. 'इलेक्टिव्ह मेरीट असणार्‍यालाच जागा द्यावी', अशी आमची भूमिका होती. या जागेवर सलग तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळेच नगरची जागा आम्ही मागितली', असा खुलासा विखे पाटील यांनी आज केला.

विखे पाटील म्हणाले..

 • पक्ष सांगेन ते काम तन, मन, धनाने केलं
 • जुनी प्रकरणे पुढे येतील म्हणून सहकाऱ्यांनी गप्प बसणं पसंत केलं
 • इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्याला जागा द्यावी ही भूमिका होती, म्हणून नगरची जागा मागितली. सलग तीन पराभव राष्ट्रवादीचे झाले होते.
 • राज्यात अनेक घटना घडल्या, समस्या निर्माण झाल्या.
 • राहुल गांधी यांनी सुचवलं, राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहा
 • राजीनाम्याची तयारी असलेलं पत्र १५ मार्चलाच राहुल गांधी यांना पाठवलं होतं
 • वडिलांचा अवमान झाला असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणे योग्य नव्हते
 • आम्ही राजकीय आत्महत्या करायची अशी राष्ट्रवादीची भूमिका होती की काय?
 • पवार विरुद्ध विखे अशी नगरची लढत रंगवली गेली. त्यामुळे मुलाच्या प्रचाराला जावं लागलं
 • राष्ट्रवादी माझ्या प्रचाराला विरोध करेल म्हणून मी इतर ठिकाणी प्रचाराला गेलो नाही.
 • पक्षाने विरोधीपक्षनेतेपदासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद!
 • पक्षाची नोटीस मिळाल्यावर उत्तर काय द्यायचं, हे ठरवेन.

विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दडपण आणण्यात आले, अशी राजकीय वर्तुळात आहे. युवक नेते सासणे यांनी वादाला वैतागून नगर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारा, असा आग्रह विरोधी गटाने धरला, असे समजते. पण विरोधी पक्षनेतेपद जाण्याच्या भीतीने विखे पाटील यांच्यावरील कारवाई येथेच थांबेल, असाही अंदाज वर्तविला जात होता. 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नगरमधून उमेदवारीही मिळविली. यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही काँग्रेसमधून दडपण आले होते. विखे पाटील आणि कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमधून बाहेर पडले, तर राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या जास्त होईल आणि विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे जाईल, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोघांच्याही दृष्टीने विखे पाटील यांनी सध्या पक्ष न सोडणेच चांगले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakrishna Vikhe Patil criticizes Congress President Rahul Gandhi