विखेंना हवे ‘महसूल’ किंवा ‘गृह’

गुरुवार, 9 मे 2019

राधाकृष्ण विखे पाटील हे आचारसंहिता संपताच आमदारकीचा राजीनामा देतील. लगेचच मंत्रिपदाची शपथ घेतील.

नगर - राधाकृष्ण विखे पाटील हे आचारसंहिता संपताच आमदारकीचा राजीनामा देतील. लगेचच मंत्रिपदाची शपथ घेतील. तोच त्यांचा भाजप प्रवेश असेल. महसूल आणि सार्वजनिक बांधकाम यातील एका खात्याचा भार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विखे यांच्या खांद्यावर देतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. विखे यांच्याकडून मात्र ‘महसूल’ किंवा ‘गृह’ या दोनपैकी एकाला पसंती दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती समारंभास उपस्थित राहण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे उद्या (ता. ९) लोणी येथे येत आहेत. पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. विखे भाजपमध्ये जाणार आणि मंत्री होणार, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देऊन, शरीराने काँग्रेसमध्ये आणि मनाने भाजपमध्ये असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराची चाहूल म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आमदारकीचा  राजीनामा देऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार आणि लगेचच मंत्रिपदाची शपथ घेणार. या उघड गुपिताची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचाली  सुरू आहेत.

कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन, त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पुढील राजकीय भूमिका जाहीर करू, असे विखे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता केव्हाही आणि कधीही राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी शक्‍यता व्यक्त केली जाते.

...आमदार नसलेला मंत्रिपदाचा सोपा मार्ग!
आचारसंहिता संपल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर विखे हे आमदार नसलेले मंत्री म्हणून मंत्रिमंडळात राहतील. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार म्हणून निवडून यावे लागते. मात्र तोपर्यंत विधानसभेची मुदत संपेल. निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे आमदार नसलेला मंत्री होण्याचा सोपा मार्ग ते निवडणार असल्याचे सूत्रांकडून सागण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakrishna Vikhe Patil will quit the code of conduct Immediately the minister will take an oath