राहुल यांना आरोप अमान्य 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानाशी संबंधित मानहानीच्या दाव्यात गुरुवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माकप नेते सीताराम येचुरी यांनी शिवडी न्यायालयात हजेरी लावली. आरोप अमान्य असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

मुंबई - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानाशी संबंधित मानहानीच्या दाव्यात गुरुवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माकप नेते सीताराम येचुरी यांनी शिवडी न्यायालयात हजेरी लावली. आरोप अमान्य असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे आता या दोघांवरही फौजदारी खटल्याची कारवाई सुरू होईल. 

गौरी लंकेश यांची हत्या सप्टेंबर 2017 मध्ये झाल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, "जो कोणी भाजप आणि रा. स्व. संघाच्या विरोधात बोलेल, त्याला मारले जाईल', अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती. येचुरी यांनीही रा. स्व. संघाचा उल्लेख केला होता. त्यामुळे या संघटनेची बदनामी झाल्याचा आरोप करणारी खासगी तक्रार वकील व संघ स्वयंसेवक धृतमन जोशी यांनी दोन वर्षांपूर्वी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने फेब्रुवारीत राहुल गांधी आणि येचुरी यांना हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात दोघेही न्यायालयात हजर झाले. त्यांनी न्यायालयाचे कामकाज शांतपणे ऐकले. दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी नावांचा पुकारा केल्यावर ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झाले. त्यांच्या विरोधातील तक्रार न्यायालयाने वाचून दाखवली आणि आरोप सांगितले. आरोप मान्य आहेत का, असा प्रश्‍न न्यायालयाने विचारला. त्यावर, आम्ही निर्दोष आहोत; आरोप अमान्य आहेत, असे दोघांनीही सांगितले. त्यामुळे आता फौजदारी खटल्याची कारवाई सुरू होईल आणि तक्रारदारासह या दोघांचे, तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येतील. 

कागदपत्रांची कार्यवाही झाल्यावर दोघेही न्यायालयाबाहेर आले. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 सप्टेंबरला होणार आहे. तक्रारदाराने कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि माकप यांनाही प्रतिवादी केले होते; परंतु न्यायालयाने त्यांच्याविरोधातील तक्रार रद्द केली. व्यक्तिशः केलेल्या विधानांबाबत पक्षावर आरोप ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

प्रत्येकी 15 हजारांचा जामीन 
शिवडी न्यायालयाने राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी गांधी यांच्यासाठी हमीदार म्हणून स्वाक्षरी केली. पुढील सर्व सुनावणींना गैहजर राहण्याची परवानगी न्यायालयाने दोघांनाही दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul allegations are invalid