
India Alliance Meeting: अदानींची चौकशी करा नाहीतर देशाला सर्व कळेल ; राहुल गांधींचे मोदींना आव्हान
Rahul Gandhi on Adani: दोन दिवसीय बैठक संपल्यानंतर इंडिया आघाडीने मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावेळी त्यांनी अदानी मुद्द्यावर देखील हल्लाबोल केला.
देशातील 60 टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक इथं बसले आहेत. कॉर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे. इंडिया आघाडीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजप सरकार गरीबांचे पैसे उद्योगपतींना देत आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत. इंडिया आघाडी भाजपला हरवणार असल्याचा विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
मी काल पत्रकार परिषद घेत सांगितलं की एका माणसासाठी पंतप्रधान काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींच्या चौकशीसाठी दबाव का टाकत नाही आहेत. मोदी आणि भाजप अदानीसोबत आहेत. मी मीडियावर जास्त बोलू इच्छित नाही पण लालू प्रसाद यादव चांगलं बोलले आहेत. पण आम्ही इंडिया आघाडी तुम्हाला मोकळं करायला तयार आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी अदानी यांची चौकशी करायला पाहीजे. त्यांनी चौकशी केली नाही तर मिलिभगत असल्याचे स्पष्ट होईल. देशातील 60 टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक इथं बसले आहेत. त्यामुळे भाजप जिंकू शकत नाही. भाजप गरीबांचे पैसे निवडक लोकांना देते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, मी नुकताच लडाख दौरा केला. तिथली परिस्थिती पाहिली. चीन आपल्या भागात आला आहे. मीडिया याबाबत काहीच बोलत नाही. लडाखमध्ये जी परिस्थिती आहे ती लज्जास्पद आहे. नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील जे नातं आहे त्यावर मी काल बोललो. 1 बिलियन डॉलर्स भारतातून बाहेर गेले आणि परत आले. नरेंद्र मोदी G20 भरवत आहेत. मात्र त्यांनी अदानी यांची चौकशी करावी.