Weather Update: राज्यातील 'या' भागांमध्ये आजही पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Weather Updates

Weather Update: राज्यातील 'या' भागांमध्ये आजही पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसात देशासह राज्यात ऊन- पावसाचा खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही भागांमध्ये अवकाळी नंतर आता पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावताना दिसून येत आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अशात आजही 31 मे रोजी राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कालपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढच्या 24 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात येत्या 24 तासांमध्ये पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पावसाच्या हजेरीमुळे उकाडा थोडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह इतर काही भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. काही भागात उष्णतेची लाट आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे.

तर, राज्यातील काही शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. आता नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.