मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

कोकणसह कोल्हापूर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत रविवारी आणि सोमवारी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यालगत असलेल्या जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडलेल्या पावसामुळे या जिल्ह्यांची सरासरी भरून निघाली आहे.

पुणे- कोकणसह कोल्हापूर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत रविवारी आणि सोमवारी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यालगत असलेल्या जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडलेल्या पावसामुळे या जिल्ह्यांची सरासरी भरून निघाली आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोकण, नाशिक, जळगाव, गडचिरोली या भागात गेल्या दोन दिवसांत प्रामुख्याने चांगला पाऊस झाला. 

विसर्गानंतर गोदावरीला पहिला पूर
नाशिक - गंगापूर धरण भरल्यानंतर सोमवारी दुपारपासून गोदावरीत ६,५१० क्‍युसेकने पाणी सोडायला सुरवात झाली. त्यामुळे गोदावरी दुथडी वाहू लागली. गंगापूर धरण ८३ टक्के भरल्यानंतर विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर, दारणा आणि पालखेड अशा तिन्ही समूहांतून विसर्ग सुरू झाला आहे. सोमवारी १६,६८८ क्‍युसेकपर्यंत हा विसर्ग वाढविला गेला. गंगापूर समूहातून ३,५०० व त्यानंतर ६,५१० क्‍युसेकने, तर नांदूरमध्यमेश्‍वरमधून ५४,८४५ क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढवत मराठवाड्याच्या दिशेने पाण्याचा प्रवास सुरू आहे. 

मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली
मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सायंकाळी ७ नंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी आणि वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरात पाणी घुसले असून, खेडमध्ये अलर्ट दिला. 

खानदेशात बहुतांश भागांत पाऊस
पावसामुळे जळगाव जिल्ह्यात तापी नदीला पूर आला असून, हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले आहेत. रावेर तालुक्‍यात सात गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. धुळे जिल्ह्यातील बुराई नदीला पूर आला आहे.

मेळघाटात पाऊस
विदर्भात दीड महिन्यापासून अद्याप दमदार पाऊस पडलेला नाही. मात्र सोमवारी मेळघाटात मुसळधार पाऊस पडला असून, तीन गावांचा संपर्क तुटला. तसेच, चंद्रपूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. बल्लारपूर तालुक्‍यातील दहेली नाल्यावरील पूल वाहून गेला. चंद्रपूर-आष्टी-अहेरी मार्गही पावसामुळे सकाळपासून बंद होता. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्‍यात जोरदार पाऊस; शंभर गावांचा संपर्क तुटला. वर्धा, गोंदियातही पावसाची रिपरिप झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in Central Maharashtra and vidarbha