राज्यात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

हवामान खात्याची माहिती; पूर्वमौसमी पावसाला पोषक वातावरण

पुणे - येत्या रविवारपासून (ता. ३०) पुढील तीन दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला. राज्यात पूर्वमौसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत असल्याने विदर्भातही येत्या सोमवारपासून (ता. १) दोन दिवस पाऊस पडेल, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये हवामान कोरडे होते. मात्र, सोलापूर परिसरात शुक्रवारी दुपारी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे ४५.१ अंश सेल्सिअस, तर पुण्यात कमाल तापमानाचा पारा ३८.३ अंश सेल्सिअस नोंदला गेला.

नैॡत्य राजस्थान ते अरबी समुद्राच्या ईशान्येपर्यंत आणि पूर्व बिहारपासून छत्तीसगड, झारखंडपर्यंत दुसरा कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रापासून ते कर्नाटकाच्या समुद्रकिनारपट्टीमार्गे कन्याकुमारीपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात रविवारनंतर पावसाची शक्‍य वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा अद्याप चाळिशीच्या वर आहे. मात्र, पुढील तीन दिवसांमध्ये तेथे काही भागात पावसाच्या सरी पडतील. ओरिसातील काही भाग वगळता देशाच्या इतर भागातील उष्णतेची लाट ओसरली आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुण्यातील तापमानात चढ- उतार
शहरात ३५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला कमाल तापमानाचा पारा आता ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याने उन्हाचा चटका कमी होईल. त्यामुळे शहरातील कमाल तापमान पुढील दोन दिवस ३७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची शक्‍यता आहे. येत्या सोमवारी (ता. १) कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

Web Title: rain chances in state