विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला हुडहुडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे - बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले. पूर्व विदर्भात सोमवारी पावसाच्या सरींनी हजेरी लावली, तर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने मध्य महाराष्ट्राला हुडहुडी भरली. पुणे, नगर, जळगाव, नाशिक येथे नीचांकी तापमानाची नोंद होत पारा ८ अंशांपर्यंत घसरला, तर धुळे येथे हंगामातील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस, निफाड (जि. नाशिक) येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

‘पेथाई’ चक्रीवादळाने बाष्प खेचून अाणल्याने पूर्व विदर्भात पावसाला सुरवात झाली होती. भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत होत्या. तर यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. विदर्भात उद्या (ता. १८) ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. 

सातत्याने पडणाऱ्या भिज पावसामुळे वाढीच्या अवस्थेतील रब्बी पिकांना लाभ होणार आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. या भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे. कोकण आणि मराठवाड्यात तापमान सरासरीच्या जवळपास आहे, तर पावसाला पोषक हवामानामुळे विदर्भाच्या किमान तापमान वाढ झाली. सोमवारी मध्य महाराष्ट्राच्या तापमानात १ ते ३ अंशांची घट झाली होत तापमान १० अंशांच्या खाली आले होते. पुणे, नगर, जळगाव, नाशिक येथे तापमान ८ अंशांच्या जवळ आल्याने हुडहुडी वाढली. राज्यात आज थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये)
   
पुणे     ८.३ (-३) 
   नगर     ८.७(-३) 
   जळगाव     ८.४ (-३)
   महाबळेश्‍वर     १०.४(-३) 
   मालेगाव     १०.० (-१)
   नाशिक     ८.५(-२)

Web Title: Rain Cold Vidarbha Maharashtra