राज्यात पावसाची कोसळधार

Rain
Rain

धरणांतून विसर्ग सुरू, नद्यांना पूर; जनजीवन विस्कळित
मुंबई - सक्रिय झालेल्या पावसाने राज्याच्या बहुतांश भागांना कालपासून झोडपून काढले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच विदर्भात पावसाचा चांगला जोर आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे, तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत प्रथमच दमदार पाऊस झाला.

विदर्भात जोर
नागपूर - गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, वाहतूक ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावाला पाण्याने वेढल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस आहे. शुक्रवारी (ता. २) रात्री जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्‍यात झाला. यामुळे लाखांदूर, नागपूर, सावरला व कन्हाळगावकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. आसगाव येथील ७७, ढोरप येथील १५ व वाही येथील २० घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे येथील १२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.  पवनी-कोरंभी मार्गावरील विठोबा वैद्य यांच्या पोल्टीफार्ममध्ये ४१२ कोबड्यांचा मृत्यू झाला. 

मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा वाढल्याने ३३ दरवाजे उघडून ५,८६८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा दुथडी वाहत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने नदी, नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अंतर्गत मार्ग पावसामुळे बंद झाले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्‍यातील उचली येथील भोजराज रामदास डोंगे (वय ५५) नाल्यात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. 
यवतमाळ जिल्ह्यातही नदी-नाल्यांना पूर आला आहे. पैनगंगेच्या काठावरील ४७ गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

देवबागला उधाणाचा तडाखा
मालवण - समुद्राला आज दुपारी आलेल्या उधाणाचा जोरदार तडाखा देवबाग गावास बसला. यात गावातील ख्रिश्‍चनवाडीत संरक्षक बंधाऱ्यावरून समुद्री लाटांचे पाणी वस्तीत घुसले, तर मोबारवाडी येथील येथील सुमारे २५० गुंठे जमीन समुद्राने गिळंकृत केली. 

एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कर्ली अशा कात्रीत असलेल्या देवबागला दरवर्षी पावसाळ्यात याच समस्येला सामोरे जावे लागते. आजच्या उधाणात समुद्री लाटांबरोबरच खाडीचे पाणीही गावात घुसले. देवबाग गावास सागरी अतिक्रमणाचा फटका बसल्याची माहिती मिळताच मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी दुपारी देवबाग गावास भेट देत पाहणी केली. ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी दिली.

पालघरमध्ये मुलगा वाहून गेला
पालघर -
 जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसाने हाहाकार उडाला असून, त्यामुळे येथील सर्व नद्यांना पूर आला आहे. या पुरात एक मुलगा आणि चार गायी वाहून गेल्या. पावसामुळे घरांची पडझड झाली; तसेच रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटून जनजीवन विस्कळित झाले. सीताराम शिवराम चौधरी असे तिवसपाडा नदीत वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. धामणी व कवडास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्याने सूर्या व गुलझारी नदीचे पाणी पात्राबाहेर आले. सूर्या नदीवरील पुलावरून वेगाने पाणी वाहत असताना या वेळी पुलावरून गाई जात होत्या. या वेळी यातील चार गाई पाण्याचा अंदाज न आल्याने पुरात वाहून गेल्या.

डहाणूला झोडपले
डहाणू - पावसाच्या संततधारेने डहाणू तालुक्‍याला अक्षरशः धो-धो धुतले. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्णतः ठप्प झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शाळा-महाविद्यालये बंद ठेवली होती. 

नांदेड, परभणी, हिंगोलीत दमदार
नांदेड/औरंगाबाद - नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत काल (ता. २) रात्री उशिरा प्रथमच दमदार पाऊस झाला. नद्या, नाले खळाळले. काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.  

नांदेड - जिल्ह्याच्या सर्व तालुक्‍यांत काल रात्री दमदार पाऊस झाला. किनवट, हदगाव, हिमायतनगर तालुक्‍यांत अतिवृष्टीची नोंद झाली. 

परभणी - अनेक दिवसांपासून केवळ रिमझिम हजेरी लावणाऱ्या पावसाने काल रात्री उशिरा प्रथमच सर्वदूर दमदार हजेरी लावली. 

हिंगोली - जिल्ह्यात प्रथमच काल रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५५.३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कयाधू, पैनगंगा, जलेश्‍वर नद्यांना यंदाचा पहिला पूर आला. 

लातूर - जिल्ह्यात दोन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर काल रात्री सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर हा पाऊस कोसळत होता. 

जालना - जिल्ह्यात केवळ रिमझिम सुरू असून, सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी  ९.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com