चैतन्यसरी: पावसाने धरणांच्या पातळीत वाढ

चैतन्यसरी: पावसाने धरणांच्या पातळीत वाढ

पुणे - दुष्काळाने होरपळलेल्या आणि पाणीकपातीच्या संकटाशी झुंजणाऱ्या मध्य महाराष्ट्रावर नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरीवर सर रविवारी दिवसभर बरसल्या. राज्यात झालेल्या सर्वदूर पावसाने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये कोकण आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मॉन्सून दाखल होऊन वीस दिवस झाल्यानंतरही हवामान खात्याच्या मध्य महाराष्ट्र या उपविभागात दमदार पावसाची प्रतीक्षा होती. या उपविभागात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला होता. त्याच वेळी कोकणासह मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली होती. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. पुण्यात जूनमध्ये फक्त 51 टक्के पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सतत पडलेला दुष्काळ आणि पाणीकपात यामुळे प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट बघत होता. बहुतप्रतीक्षेत असलेल्या मॉन्सूनने शनिवारी रात्रीपासून जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागात या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणातील चारही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे.

कोकणातील काही भागांत गेल्या 24 तासांमध्ये अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर काही भागात जोरदार पाऊस पडला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुणे परिसर चिंब
- खडकवासला धरण प्रकल्पात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 2.96 टीएमसी पाणीसाठा. तूर्तास आणखी पाणीकपात टळली
- पुणे-मुंबई मार्गावरील परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसना एक ते दीड तास उशीर. रेल्वे गाड्यांवरही परिणाम
- सिंहगड, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी
- मावळातील पवना, इंद्रायणी, आंद्रा, कुंडलिका आदी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
- पुणे जिल्ह्यात संततधार. खरिपाच्या पेरण्यांना सुरवात होणार

साताऱ्यात दमदार
सलग तिसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय असून, आज पश्‍चिम भागात त्याचा जोर वाढला होता. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत 16.51 टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण 15.81 टक्‍के भरले आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 391 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विविध घाटांत दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच असून मांढरदेव घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. दुष्काळी भागातही विविध ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे.

प्रमुख ठिकाणी झालेला पाऊस
(मिलिमीटरमध्ये)
कोयना 156
नवजा 196
महाबळेश्‍वर 208

प्रमुख धरणांतील पाणीसाठा
(टीएमसीमध्ये) सायंकाळी पाचपर्यत
कोयना 16.51
कण्हेर 2.04
धोम 2.80
धोम-बलकवडी 0.87
उरमोडी 3.71


काही भाग कोरडा
मध्य महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे पावसाने जोर धरला असला, तरीही मराठवाड्यातील औरंगाबाद (9 मिलिमीटर) वगळता इतर जिल्हे कोरडे राहिले. उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि बीड या भागात रविवारी पावसाची नोंद झाली नाही. मात्र, जूनमध्ये या भागाने सरासरी गाठली असल्याचेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. विदर्भातील अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला नाही.

मॉन्सूनचा प्रवास
मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, त्यानंतरचा प्रवास मॉन्सूनचा ट्रफ कुठे स्थिरावतो यावर अवलंबून असेल, अशी माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. मॉन्सूनची उत्तर सीमा (मॉन्सून ट्रफ) आज आणखी पुढे सरकली. पूर्व राजस्थान, हरियाना, पंजाब या भागात मॉन्सूनची वाटचाल सुरू आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मॉन्सूनची वाटचाल उत्तर अरबी समुद्र, गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने होण्यास अनुकूल वातावरण आहे. वायव्य बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता झारखंड आणि पश्‍चिम बंगालच्या भागावर आहे. अरबी समुद्रावरून येणारी आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मॉन्सूनच्या शाखेचा प्रवास उत्तरेला सुरू आहे. मॉन्सूनचा हा ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावल्यास उत्तर भारतात पावसाचा जोर वाढेल. तर तो उत्तर प्रदेशच्या दरम्यान स्थिरावल्यास महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल. सध्या ट्रफ उत्तरेकडे सरकत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले.

दृष्टिक्षेपात राज्यातील पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)
मध्य महाराष्ट्र
पुणे ........... 26
नगर ............. 3
कोल्हापूर ...... 9
महाबळेश्‍वर .... 64
सांगली ......... 5
सातारा ............ 15

उत्तर महाराष्ट्र
नाशिक ......... 43
जळगाव ...... 45

कोकण
सांताक्रूझ ...... 94.4
अलिबाग ....... 17
रत्नागिरी ........ 19

विदर्भ
अकोला .......... 18
नागपूर ........... 15
वर्धा ............... 6
(स्रोत ः भारतीय हवामान खाते. रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा पाऊस)

24 तासांतील पाऊस
आकडे मिलीमीटरमध्ये

कोल्हापूर जिल्हा सरासरी पाऊस ः 39
सर्वाधिक पाऊस ः गगनबावडा ः 109

सांगली जिल्हा सरासरी पाऊस ः 11.6
सर्वाधिक पाऊस ः शिराळा ः 26.8

सिंधुदुर्ग जिल्हा सरासरी पाऊस ः 35
सर्वाधिक पाऊस ः मालवण ः

रत्नागिरी जिल्हा सरासरी पाऊस ः 90
सर्वाधिक पाऊस ः संगमेश्‍वर ः 108, चिपळूण ः 105

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com