पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

गेल्या चोवीस तासांत राज्यातील तुरळक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढून तापमानात वाढ झाली आहे. सध्या कोकण, गोवा, मद्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार होऊन उष्णतेत वाढ झाली आहे.

पुणे : पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आज (शुक्रवार) पावसाच्या सरी पडल्या. मराठवाड्यातील जालना, उस्मानाबाद येथे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. उर्वरित भागात कडक ऊन असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. 

मंगळवार (ता. 16) पर्यत कोकणचा दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार आहे. आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) मध्य महाराष्ट्रात गडगडाटी ढगासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. सोमवारी व मंगळवारी विदर्भाच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता असून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. 

आज (शुक्रवार) सायंकाळी पुणे शहरामध्ये पावसाने हजेरी लावली. कोथरूड, धायरी, तळेगाव, कोंढवा, सिंहगड रस्त्यावर जोरदार पाऊस झाला. पिंपरी चिंचवड भागामध्येही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहराच्या काही भागांमध्ये वीज गायब झाली होती. 

गेल्या चोवीस तासांत राज्यातील तुरळक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढून तापमानात वाढ झाली आहे. सध्या कोकण, गोवा, मद्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार होऊन उष्णतेत वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तामपान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरातही आकाश अंशत ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. 

कोकणगाव परिसरात वादळी पावसाची हजेरी 
तळेगाव दिघे :
संगमनेर तालुक्‍यातील कोकणगावसहीत परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह अर्धा तास अवकाळी पावसाने हजेरी लावली. वडगावपान, कौठेकमळेश्वर, लोहारे, कासारे, मेंढवण या ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. काही ठिकाणी डाळिंब बागांना दिलासा मिळाला, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस डाळिंब बागांच्या नुकसानीस कारणीभूत ठरला. पावसाने ग्रामस्थांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. 

पिंपरीमध्येही पाऊस 
पिंपरी :
पिंपरी चिंचवड शहरात उन्हाचा 41 अंश सेल्सिअसवर पारा गेल्याने तापमानात वाढ झाली होती. परिणामी दोन दिवसापासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. पूर्व मोसमी पावसाने आज (शुक्रवार) हजेरी लावल्याने पिंपरी चिंचवडकरांना दिलासा मिळाला. 

सकाळपासून आज ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर गडगडाटी ढग जमा होते. त्यानंतर विजेच्या गडगडात पाऊस पडण्यास सुरवात झाली. पिंपरी चौक, काळेवाडी, निगडी आदी भागात तुरळक पाऊस पडला, तर वाल्हेकरवाडी परिसरात जोरदार पाऊस पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. 

तासगाव तालुक्‍यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू 
तासगाव :
तासगाव तालुक्‍यात शुक्रवारी पुन्हा वळवाच्या पावसाने हजेरी लावली. तालुक्‍यातील वडगाव येथे झाडाखाली थांबलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. 

वडगाव येथील शाळूचा मळा परिसरात सहा जण फांद्या तोडत होते. दरम्यान पाऊस आल्याने काम बंद करून सर्वजण घरी परत येत होते. पाऊस वाढल्याने वाटेत सर्वांनी झाडांचा आसरा घेतला. वडगाव येथील शंकर कोंडिबा पाटील आणि अरविंद राजाराम डिसले आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. त्याच झाडावर विजेचा लोळ येऊन कोसळला आणि दोघेही जागीच ठार झाले. उर्वरित चौघे सुदैवाने दुसऱ्या झाडाखाली असल्याने वाचले. मृत दोघेही शेतमजूर होते. 

Web Title: Rain lashes out Pune, Kolhapur, Sangli, Marathwada