पावसाची ६१ तालुक्‍यांत दडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

राज्यातील स्थिती...

  • केंद्र सरकारच्या पीक अंदाज केंद्राने दुष्काळाचा दिला राज्याला अहवाल
  • राज्य सरकारच्या दुष्काळ पडताळणी ॲपद्वारे ६१ तालुक्‍यांची होणार सत्यता पडताळणी
  • यंदा पावसाअभावी बळिराजाच्या तब्बल चार हजार कोटींच्या नुकसानीचा नजर अंदाज अहवाल
  • २७ ऑक्‍टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार मिळणार दुष्काळी मदत
  • सप्टेंबरपर्यंत सत्यता पडताळणी अन्‌ केंद्राकडे मदत मागणी, तर ऑक्‍टोबरमध्ये मिळेल भरपाई.

सोलापूर - राज्यभरातील ६१ तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्‍केही पाऊस झाला नसून, केंद्र सरकारच्या पीक अंदाज केंद्रातर्फे या तालुक्‍यांमधील पिकांची वाढ, जमिनीतील आर्द्रतेची पडताळणी ॲपद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार चार हजार कोटींचे नुकसान झाल्याचा नजरअंदाज सरकारला पाठविण्यात आला असून, संबंधित तालुक्‍यातील पिकांची सत्यता पडताळणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी स्तरावर सत्यता पडताळणीला सुरवात होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अहवाल राज्य सरकारला जमा होतील आणि ऑक्‍टोबरअखेर शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, असे नियोजन सरकार पातळीवरून करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मागील वर्षी दुष्काळामुळे लातूर, अमरावती, नाशिक, पुणे विभागात पिण्याच्या पाण्याचे तब्बल सहा हजार टॅंकर सुरू झाले. अद्याप त्याचे प्रमाण कमी झाले नसून चारा छावण्याही सुरूच आहेत. मागील दुष्काळाची तीव्रता कायम असतानाच यंदाही नैसर्गिक पावसाची दडी अन्‌ कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या विमानांच्या हवेत नुसत्याच घिरट्यांमुळे सरकार हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या तालुक्‍यांमधील सद्यःस्थितीची सत्यता पडताळणी करण्याचे नियोजन युद्धपातळीवर केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Less in 61 Tahsil in Maharashtra State