राज्यात पावसाचा जोर ओसरला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

बंगालच्या उपसागरात किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी निवळले. परिणामी, सकाळपासून राज्यातील पावसाचा जोरही ओसरला.

पुणे - बंगालच्या उपसागरात किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी निवळले. परिणामी, सकाळपासून राज्यातील पावसाचा जोरही ओसरला. काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या ते मध्यम सरी येत होत्या; तर अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक 320 मिलिमीटर; तर अनेक ठिकाणी 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. 

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांतील अनेक भागांत रविवारी दुपारपर्यंत अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर; तसेच नाशिक शहर व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. दारणा धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्र्यंबकेश्‍वर शहरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली होती. नगर जिल्ह्याच्या अनेक भागांत अजून पावसाचा जोर नाही. मात्र भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस टिकून आहे. त्यामुळे मुळा व भंडारदरा धरणात दोन-तीन दिवसांपासून पाण्याची बऱ्यापैकी आवक होत आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दुपारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पश्‍चिम भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्‍यातील लाटवण, पिंपळगाव, चिंचघर नदीकिनारा जलमय झाला होता. 

काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 
बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात पावसाने जोर धरला. मंगळवारपर्यंत (ता.30) राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कमी दाबक्षेत्राचा प्रभाव कमी झाला असून, सोमवारी (ता.29) कोकणात तुरळक ठिकाणी अतिजोरदार, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे बुधवारपर्यंत (ता.31) कमी दाबक्षेत्राची नव्याने निर्मिती होण्याचे संकेत असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain less in Maharashtra