पावसाने उन्हाची काहिली कमी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे - वादळीवारा आणि गारपिटीसह पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील उष्णतेची लाट रविवारी ओसरली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 43 अंश सेल्सिअसपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षाही खाली गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

पुणे - वादळीवारा आणि गारपिटीसह पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील उष्णतेची लाट रविवारी ओसरली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 43 अंश सेल्सिअसपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षाही खाली गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

राज्यात जळगाव येथे सर्वाधिक म्हणजे 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. विदर्भात उष्णतेची लाट पसरली होती. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यात होरपळत होता. मात्र, उत्तरेतील वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडून आलेल्या बाष्पयुक्त वारे मध्य भारताच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे पुढील दोन ते चार दिवसांमध्ये विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

कोल्हापूर, सातारा, सांगलीसह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाने रविवारी दुपारी हजेरी लावली. ढगाळ वातावरण, गारपीट आणि पाऊस यामुळे राज्यासह देशातील उष्णतेची लाट ओसरली आहे. राजस्थानमध्येही कमाल तापमानाचा पारा कमी झाला आहे. 

विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच, राज्यात पुढील चार दिवसांमध्ये राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असेही सांगितले आहे. 

राज्यातील कमाल तापमान (कंसात सरासरीपेक्षा कमी झालेला पारा) 
पुणे ............. 36.8 (-0.5) 
लोहगाव ........ 36.6 (-0.4) 
कोल्हापूर ....... 35.3 (-1.8) 
महाबळेश्‍वर ..... 32.3 (0.6) 
मालेगाव .......... 40.2 (1) 
सोलापूर ........... 38.3 (-1.2) 
औरंगाबाद ........ 36.7 (-1.2) 
परभणी ............. 38.9 (-0.9) 
नांदेड .............. 37.5 (-2.5) 
अकोला ........... 39.7 (-0.3) 
अमरावती ......... 36.4 (-3.9) 
ब्रह्मपुरी ........... 33 (-6.4) 
चंद्रपूर .............. 36 (-4.4) 
गोंदिया ............... 37.5 (-1.7) 
नागपूर ............... 34.8 (-4.7) 
वर्धा .................. 37.8 (-2.3) 
यवतमाळ ........... 37 (-2.4) 

(स्रोत ः भारतीय हवामान खाते, सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये) 

Web Title: rain in maharashtra