राज्यात पावसाची संततधार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाने जोर धरला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा, कोयना या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, शेतांमध्ये पाणी शिरले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे.

पुणे  - कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाने जोर धरला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा, कोयना या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, शेतांमध्ये पाणी शिरले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. गुरुवारीही दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडला. कोकणात रायगडमधील मुरूड येथे सर्वाधिक १८५ मिलिमीटर पाऊस पडला. तर, अलिबाग, भिरा, मानगाव, माथेरान,  म्हसळा, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, तला सिंधुदुर्गमधील वैभववाडी येथे मुसळधार पाऊस पडला. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम आहे. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत असून धरणानांतून विसर्ग सोडण्यात येत आहे.  

मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यातही संततधार सुरू आहे. शुक्रवारीही या भागात पावसाच्या चांगल्याच सरी बरसत होत्या. कोल्हापुरातील गगनबावडा येथे २१० मिलिमीटर पाऊस पडला. आजरा, चांदगड, गारगोटी, राधानगरी, शाहूवाडी, नंदुरबार, इगतपुरी, पौड, महाबळेश्वर येथेही जोरदार पाऊस पडला. धरणातील पाणीपातळीत  वाढ होत असल्याने पुणे जिल्ह्यातील मुळशी, वरसगाव, पानशेत, पानशेत, भामाआसखेड, आंध्रा, माणिकडोह, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.  मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी पडत आहे.

राज्यभरातील  पाऊस
    मुंबईसह पुण्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता 
    कोल्हापूर -  धरणक्षेत्रासह संततधार. पंचगंगा नदीची धोक्‍याच्या पातळीकडे
    जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली
    नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली 
    सांगली - कृष्णेची पाणीपातळी वाढली
    आयर्विनजवळ पाणीपातळी २९.६ फूट
    सातारा - कोयना धरणाचे दरवाजे साडेचार फुटांपर्यंत 
    धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा
    सोलापूर - चंद्रभागा नदीची पाणीपातळी वाढली

विदर्भ
    नागपूरमध्ये मुसळधार पाऊस. पुढील तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ 
    गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, १८ मार्ग बंद, ३०० गावांचा संपर्क तुटला
    चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्‍यात जोरदार पाऊस
    भंडारा जिल्ह्यातील पवनी लाखांदूर येथे दमदार पाऊस
    अमरावती जिल्ह्यात दहा मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडले
    अमरावतीमध्ये पुरातील बसमधील १८ प्रवाशांची सुखरूप सुटका

कोकण 
    सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Maharashtra