अवघे राज्य जलमय

अवघे राज्य जलमय

पुणे -  राज्यातील बहुतांश भागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे सर्वाधिक १६० मिमी पावसाची नोंद झाली. 

मुसळधार पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील बेन्नितुरा, नगरमधील सीना, पुणे जिल्ह्यातील कऱ्हा या नद्या पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिल्या. सांगली जिल्ह्यात येरळा नदीला पूर आल्याने बलवडी - तांदळगाव पूल पाण्याखाली गेला होता. आटपाडी येथे टेंभू योजनेचा डावा कालवा जादा पाण्याच्या दाबाने फुटल्याने पडळकरवाडीतील शेतजमिनी वाहून गेल्या. सोलापुरातील मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे वीज पडून पूजा हुगी या महिलेचा मृत्यू झाला. जेऊर (ता. अक्कलकोट) आणि निंबळक (ता. बार्शी) येथे वीज पडून १५ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. तेल्हारा (जि. अकोला) तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूचा उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. राज्यातील बहुतांश भागांत मंगळवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. सायंकाळनंतर बहुतांश भागांत पावसाने जोर धरला. अनेक ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

कोकणातील संगमेश्‍वर देवरूख येथे ११८ मिमी पावसाची नोंद झाली. खेड, लांजा, माथेरान, रत्नागिरी, पोलादपूर, मंडणगड, सावंतवाडी, कणकवली, वाकवली, सुधागडपाली येथेही मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील वरवंड येथे १३१ मिमी पावसाची नोंद झाली.  सोलापुरातील अक्कलकोट येथे ९६ मिमी पाऊस झाला. वाई, कडेगाव, भोर, पुणे, कवठेमहांकाळ, जावळीमेढा, कऱ्हाड, माळशिरस, खटाव, फलटण या भागांत मुसळधार पाऊस झाला. घाटमाथ्यावरील ठाकूरवाडी, वाणगाव, अंबोणे, शिरोटा, कोयना, खंद, शिरगाव येथेही जोरदार पाऊस झाला.

मराठवाड्यातही पावसाने चांगलाच जोर धरला. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. लोहारा (जि. उस्मानाबाद) येथे १०७ मिमी पावसाची नोंद झाली. उमरगा येथेही ८८ मिलिमीटर पाऊस पडला. तुळजापूर, शिरूर अनंतपाळ, माजलगाव, पालम येथेही जोरदार पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. विदर्भातील बल्लारपूर येथे ३६.४ मिमी पाऊस झाला. चांदूर, वर्धा, चंद्रपूर, मूल, गडचिरोली, नरखेडा, कोर्ची, वरोरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने खरिपातील तूर, कपाशी पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

बुधवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग) 
कोकण - मुंबई ६७.२, सांताक्रूझ ३०.२, वसई १७, अलिबाग २९.६, कर्जत ८७.४, खालापूर ८४, महाड ४५, माणगाव ३८, माथेरान १०८, म्हसळा २०, मुरूड २८, पनवेल २१.४, पेण ५५, पोलादपूर ९२, रोहा ५७, श्रीवर्धन २५, सुधागडपाली ६८, तळा ३८, उरण १९, चिपळूण ६५, दाभोलीम ३२.६, हर्णे ३८, खेड १०२, लांजा ११०, मंडणगड ८३, राजापूर ७५, रत्नागिरी ९८.९, संगमेश्‍वर देवरूख ११८, वाकवली ६८.२, देवगड ६२, कणकवली ७६, कुडाळ ३०, मालवण २७, मुल्दे ३६.२, रामेश्वर ७३.४, सावंतवाडी ९४, वैभववाडी १६०, अंबरनाथ १५, कल्याण १५.८, मुरबाड ८४, शहापूर २०, उल्हासनगर २० 

मध्य महाराष्ट्र - नगर २५, अकोले १८, कर्जत ११, पारनेर ३९, साक्री १८, रावेर १३, चांदगड २९, गडहिंग्लज १३, गगनबावडा ४७, गारगोटी १६, हातकणंगले ३१, कागल ४५, कोल्हापूर ६४.२, पन्हाळा ४०, राधानगरी ३६, शाहूवाडी ४५, शिरोळ ३२, कल्याण २२, निफाड २३.४, बारामती ५९.६, भोर ६४, दौंड ६८, जुन्नर ३२, खेड २२, पौड ३८, पुणे शहर ८७.३, पुरंदर २८, शिरूर १५, वडगाव मावळ ६२, वेल्हे १७, कडेगाव ७०, कवठेमहांकाळ ६०.१, मिरज ५३, पलूस २९, तासगाव ४४, विटा ५९, वाळा १५, दहिवडी ५५, जावळीमेढा ८५, कऱ्हाड ८१, खंडाळा ५७, खटाव ६६.४, कोरेगाव ४९,पढेगाव ४१, फलटण ७६, वाई ९२.२, अक्कलकोट ९६, बार्शी २३, माढा २६.२, माळशिरस ७८, मोहोळ १३.४. 

मराठवाडा - पैठण १६, धारूर ३८, माजलगाव ४०, औंढा नागनाथ १२, घनसांगवी १४, परतूर १९.८, अहमदपूर १७, औसा ३९, चाकूर २२, लातूर २५, रेणापूर १७, शिरूर अनंतपाळ ३८, धर्माबाद १०, कंधार १२, उमरी १५, कळंब १४, लोहारा १०७, तुळजापूर ६२, उमरगा ८८, वाशी १६, गंगाखेड १५, पालम ६६, पूर्णा १२, सेलू १९.

विदर्भ - चांदूर ३२.३, चिखलदरा ११.४, संग्रामपूर १०.७, बल्लारपूर ३६.४, भद्रावती १९, चंद्रपूर २७.३, गोंडपिंप्री २२.७, कोरपना २१.४, मूल ३०.५, राजूरा २०.३, सिंदेवाही ११.३, वरोरा ३२.१, अहेरी ११.९, भामरागड १६.६, चार्मोशी १८.८, इटापल्ली १९, गडचिरोली २६.८, कोर्ची २५.८, गोंदिया १६, कुही ११.४, नरखेडा २५, आर्वी २८.५, देवळी १५.७, खारंगा ५०, वर्धा ३५.३, मालेगाव १५.६, वाशीम ११.२, घाटंजी ११.५, कळंब १८.२, मारेगाव १३.२, नेर १९.२, राळेगाव ११.५, वणी १५.४, यवतमाळ १०.९, झरीझामनी १०.६. 

पावसाचा जोर कमी होणार   
अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणात चक्राकार वाऱ्याची स्थिती काही प्रमाणात आहे. तसेच मध्य प्रदेशच्या नैॡत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, ते विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पुढील चार ते पाच दिवस हवामान ढगाळ राहील. शनिवारपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.   

ढगफुटीसारख्या पावसाचा तडाखा
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘हिक्‍का’ वादळाचा फटका रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना बसला. रत्नागिरीतील लांजा आणि मंडणगड तालुक्‍यात ढगफुटीसारख्या पावसाने मोठे नुकसान झाले. ढगफुटीसदृश झालेल्या पावसाचा तडाखा सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्‍यातील अनेक गावांना बसला. भांबेड कुडेवाडी (ता. लांजा) येथे नदीकाठच्या घरांत पाणी घुसले. बुधवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात ८४.८९ मिलिमीटर पाऊस झाला. कणकवली तालुक्‍यातील कलमठ, जानवली, वरवडे भागातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com