पावसासाठी आठवडाभर "वेटिंग'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात पावसासाठी आठवडाभर तरी वाट पहावी लागेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली. मॉन्सूनच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण नसल्याने हा खंड पडला आहे. दक्षिण कोकणात पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाजही वर्तविला आहे.

राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर तीन दिवसांमध्ये त्याच्या प्रगतीत खंड पडला आहे. तळकोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यात गुरुवार (ता. 14) पासून हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. तर पूर्व विदर्भातील मुलचेरा, चामोर्शीसह काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

अरबी समुद्रावर ढगांची गर्दी कमी झाली असून, राज्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने तळकोकणात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्‍यता आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वेगाने वारे वाहून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

आज हलक्‍या सरींची शक्‍यता
शहर आणि परिसरात बुधवारी (ता. 13) पावसाच्या एक-दोन हलक्‍या सरी पडण्याचा अंदाज असून, त्यानंतर मात्र पुढील चार ते पाच दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा 32 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेला पारा 34 अंशांपर्यंत वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: rain monsoon environment