राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

पेरण्यांना वेग येणार
आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होताच पावसाच्या सरींनी जोर धरल्याने खरिपाच्या अशा पल्लवित झाल्याने पेरण्यांना वेग येणार आहे. पावसामुळे भुईमूग, सोयाबीन आदी पेरण्यांना गती येण्याची चिन्हे आहेत. यामुळे पेरणीपूर्व व पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापला; तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सून पोचला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागासह संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनचा मजल दरमजल प्रवास सुरूच आहे. रविवारी (ता. २३) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. त्यानंतर सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हजेरी लावत अलिबाग, मालेगावपर्यंतचा टप्पा गाठला. दुष्काळाने होरपळत असलेल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला, वाशीम या तीनही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. बुलडाणा तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आला.

मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होत आहे. सोमवारी (ता. २४) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागांत चाल केली आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) संपूर्ण राज्य व्यापून, मॉसून दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या काही भागांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Maharashtra