चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

पुणे- बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेले वर्दा चक्रीवादळ येत्या सोमवारी (ता. 12) पूर्व किनारपट्टीवर आदळणार असून, पूर्व किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी वर्तविली आहे.

पुणे- बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेले वर्दा चक्रीवादळ येत्या सोमवारी (ता. 12) पूर्व किनारपट्टीवर आदळणार असून, पूर्व किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात दक्षिणेला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर गुरुवारी (ता. 8) वर्दा या चक्रीवादळात झाले. या वादळाची तीव्रता वाढून ते तीव्र चक्रीवादळ झाले आहे. ते आता पूर्वकिनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्याचा वेग ताशी 115 किलोमीटर आहे. उद्या दुपारनंतर उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. किनारपट्टीला धडकल्यानंतर या वाऱ्याचा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत कमी होईल. त्यानंतर हे वादळ शांत होईल.

चेन्नईसह थिरुवल्लूर, कांचिपुरम, तसेच पुद्दुचेरी, नेल्लोर या भागात हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान, बंगालचा उपसागर खवळलेला असेल. आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत मुसळधार पाऊस पडणार असून, या चक्रीवादळामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे झोपड्या, कच्ची घरे यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, वीज आणि मोबाईल टॉवर्स यांच्यावर झाडाच्या फांद्या कोसळून दळणवळण यंत्रणा आणि वीजपुरवठा विस्कळित होण्याचाही धोकाही हवामान खात्याने वर्तविला आहे.

चेन्नई येथे समुद्रकिनाऱ्यावर धडकणारे वर्दा हे चक्रीवादळ पुढे घोंघावत जाऊन पूर्व कर्नाटकदरम्यान संपेल. यामुळे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकबरोबरच महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाडा येथे पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस पडेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

Web Title: rain possible due to gale in state