esakal | राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाजIRain
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुलाब चक्रीवादळामुळे हाहाकार केल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्याच्या काही भागांत विजा, मेघगर्जनांसह वळीव स्वरूपाच्या पावसाने दणका दिला आहे. ८ ते १४ ऑक्टोबर या आठवडाभराच्या कालावधीत पूर्व विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांशी भागांत सरीसरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. गेल्या आठवड्यातील गुलाब चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या अनेक भागांत विजा, मेघगर्जनांसह पाऊस पडत आहे.

३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत २२४ टक्के अधिक पाऊस पडला. तर जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, सातारा, विदर्भातील अमरावती, वाशीम, कोकणातील पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत उणे ९५ टक्के पाऊस पडला. भंडारा जिल्ह्यात उणे ७३ टक्के, वर्धा उणे ६६, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात उणे ६१ टक्के पावसाची नोंद झाली. मुंबई, रायगड, रत्नागिरी, लातूर, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांतही सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (८ ते १४ ऑक्टोबर) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात सरासरी इतक्या पावसाची पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दुसऱ्या आठवड्यात (१५ ते २१ ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यातील जिल्ह्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

तापमान २८ ते ३६ अंश राहाणार

पुढील आठवड्यामध्ये राज्यात कमाल तापमान २८ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २६ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यातही कमाल तापमानाचा पारा ३० ते ३६ अंश, तर किमान तापमान १८ ते २४ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

loading image
go to top