माझे पप्पा खाऊ घेऊन कधी येतील?

गुरुवार, 12 जुलै 2018

पुणेः माझे पप्पा संध्याकाळी येताना खाऊ घेऊन येणार होते, ते कधी येतील? खरं तर तिच्या प्रश्नाचे उत्तर आता कोणाकडेच नाही. पण, या प्रश्नाने अनेकांचे मन हेलावून जात आहे. हा प्रश्न आहे राईनपाडा येथील हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या राजू भोसले यांच्य पाच वर्षाच्या मुलीचा.

पुणेः माझे पप्पा संध्याकाळी येताना खाऊ घेऊन येणार होते, ते कधी येतील? खरं तर तिच्या प्रश्नाचे उत्तर आता कोणाकडेच नाही. पण, या प्रश्नाने अनेकांचे मन हेलावून जात आहे. हा प्रश्न आहे राईनपाडा येथील हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या राजू भोसले यांच्य पाच वर्षाच्या मुलीचा.

राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे 1 जुलै रोजी झालेल्या हत्याकांडामध्ये भारत शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), दादाराव शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), भारत शंकर मालवे (रा. खावे, मंगळवेढा), अगनू इंगोले (रा. मानेवाडी, मंगळवेढा) व राजू भोसले (रा. गोंदवून, कर्नाटक) यांना जीव गमवावा लागला. भिक्षा मागण्यासाठी झोपडीबाहेर पडण्यापूर्वी राजू भोसले यांनी आपल्या चिमुकलीला खाऊ घेऊन येण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासन आता आश्वासनच राहणार आहे.

'नाथपंथीय डवरी समाजातील आमचे पाच जण हे गावामध्ये भिक्षा मागत होते. ग्रामस्थांनी अतिषय क्रूरपणे त्यांची हत्या केली आहे. सर्वप्रथम त्यांनी तिघांना पकडून मारहाण करण्यास सुरवात केली. यापैकी भारतने दादाराव या भावाला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनीही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच ऐकून घेतले नाही. त्यांनी कागदपत्रेही दाखवली. पण, हातामधून कागदपत्रे हिसकावून घेऊन फाडून टाकली. पाच जणांना जाणीवपूर्वक ठेचून मारले आहे, असे हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या भारत भोसले यांचा मुलगा संतोष याने नागपूरहून 'सकाळ'शी बोलताना सांगितले. नागपूर येथे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून न्याय मागण्यासाठी ते नागपूरमध्ये आहेत.

हा कसला क्रूरपणा...
आमची माणसे भिक्षा मागत होती, यामध्ये आमचा काय गुन्हा? मेलेल्या माणसाणांनाही ते मारत होते, हा कसला क्रूरपणा म्हणायचा. आमची निरपराध गेलेली माणसे आता परत येणार नाहीत. पण, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी दादाराव भोसले यांच्या पुतण्याने केली आहे.

पाच कुटुंबे पडली उघडी....
राईनपाडा हत्याकांडामध्ये मृत्युमुखी पडलेली कुटुंबातील सर्वजण कर्ते पुरुष होते. भिक्षा मागून व काम करून हे संसाराचा गाडा हाकत होते. घरातील कर्ते पुरुषच गेल्याने कुटुंबे अक्षरशः उघड्यावर पडली आहेत. या कुटुंबामध्ये लहान-लहान मुले आहेत. अशिक्षीत असलेल्या या कुटुंबांना काहीच माहिती नाही. रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे संतोष भोसले सांगतो.

संबंधित बातमीः

Web Title: rainpada dhule mass murder case family want Justice