Sheetal Mhatre Video: "व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुख्य आरोपी प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sheetal mhatre prakash surve video

Sheetal Mhatre Video: "व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुख्य आरोपी प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे"

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून अधिवेशनातही खडाजंगी दिसून आली. अशातच आता शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात वरुण सरदेसाई यांनी मोठा दावा केलाय. प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनीच तो संपूर्ण व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केला होता. त्यामुळे खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असून या प्रकरणी राज सुर्वेंना अटक व्हायला पाहिजे, असं वरुण सरदेसाई यांनी म्हंटलं आहे. तसेच शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे असा प्रश्नही सरदेसाई यांनी केला आहे.

तर पुढे बोलताना सरदेसाई म्हणाले कि, मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते लवकरच खऱ्या आरोपीला अटक करतील. जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे. त्यांच्यावर रोज आरोप होत आहेत, कारवाया केल्या जात आहेत. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत.

मात्र ते नेते भाजपमध्ये गेले, त्यांच्यावरील कारवाया थांबतात. जनता हे सगळं बघत आहे. जनतेला हे रुचलेलं नाही आणि त्यामुळेच ठिकठिकाणी भाजपचे स्वतःच्या गडामध्येच पराभव होत असल्याचे सरदेसाई यांनी म्हंटलं आहे.

काय आहे व्हिडिओ व्हायरल प्रकरण?

गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते.

या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.