ममतांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बोलविली तातडीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

ठाकरे यांनी निवडणुकीतील मतदान हे ईव्हीएम यंत्रांऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याच मागणीसंदर्भात 21 ऑगस्टला ते मुंबईत मेळावा घेणार आहेत. त्याला निमंत्रण देण्यासाठी त्यांनी बुधवारी कलकत्त्यामध्ये बॅनर्जी यांची भेट घेतली. 

पुणे : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकता येथे भेटून गुरुवारी दुपारी मुंबईत परत आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना तातडीने बैठकीसाठी बोलावले आहे. ईव्हीएम यंत्रविरोधी रॅली, तसेच विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 

ठाकरे यांनी निवडणुकीतील मतदान हे ईव्हीएम यंत्रांऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याच मागणीसंदर्भात 21 ऑगस्टला ते मुंबईत मेळावा घेणार आहेत. त्याला निमंत्रण देण्यासाठी त्यांनी बुधवारी कलकत्त्यामध्ये बॅनर्जी यांची भेट घेतली. 

ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचाराची जोरदार मोहीम राबविली होती. "लाव रे तो व्हिडीओ' ही त्यांची टॅग लाईन त्यावेळी सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाली होती. देशभरात ती प्रसिद्ध झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाची भूमिका जाहीर करू, असे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी जाहीर केले होते. त्यामुळे, येत्या निवडणुकीवर मनसे ईव्हीएमच्या कारणावरून बहिष्कार टाकणार, स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार की विरोधी पक्षाच्या आघाडीसोबत जाणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 
ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक उद्या शुक्रवारी मुंबईत बांद्रा येथे बोलावली आहे. त्यानंतर, येत्या आठवड्यात ते मनसेचा मेळावाही घेणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे. 
........ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeay called party workers meeting to decide assembly election stategy