निर्णय फसल्यास देश खड्डयात जाईल - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय फसल्यास देश खड्डयात जाईल, अशी जोरदार टीका करत "दोन उंदीर मारण्यासाठी अख्खं घर जाळलं,' असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. काळ्या पैशाचा तिरस्कार होता, मग निवडून कसे आलात, असा रोकडा सवालही त्यांनी मोदींना विचारला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय फसल्यास देश खड्डयात जाईल, अशी जोरदार टीका करत "दोन उंदीर मारण्यासाठी अख्खं घर जाळलं,' असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. काळ्या पैशाचा तिरस्कार होता, मग निवडून कसे आलात, असा रोकडा सवालही त्यांनी मोदींना विचारला.

रवींद्र नाट्य मंदिरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शनिवारी राज ठाकरे बोलत होते. मोदींनी मोठ्या हिमतीने हा निर्णय घेतला. त्यांनी 50 दिवसांची मुदत मागितली आहे. त्यातून काही चांगले होत असेल, तर त्यांचे स्वागतच आहे; पण निर्णय फसल्यास देश खड्डयात जाईल, असे ते म्हणाले. सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागत आहे. रांगेत जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक तरी काळा पैसेवाला होता का? असा सवाल ठाकरे यांनी विचारला. देशात अवघे चार टक्के नागरिक कर भरतात. काळा पैसा कुणाकडे आहे, हे मोदी सरकारला माहीत नाही का? काळ्या पैसेवाल्यांवर छापे का टाकत नाही? लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब भाजपने अद्याप दिलेला नाही. किती दिवस जाहिराती सुरू होत्या? हा पैसा कोठून आला? काळ्या पैशांबद्दल इतका तिरस्कार होता, तर निवडून कसे आलात, असा जळजळीत सवालही त्यांनी विचारला.

राज ठाकरेंकडून प्रश्‍नांची सरबत्ती -
- दोन हजारनंतर पाचशे रुपयांची नोट बाजारात आणली. आता एक हजारची नोट बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे. पाचशे व एक हजारच्या नोटांनी काळा पैसा साठला, तर दोन हजारच्या नोटांमुळे काळा पैसा कसा थांबणार?
- नियोजन न करता हा निर्णय घेतला गेला आहे. दहा महिन्यांपासून तयारी सुरू होती, असे सांगितले जाते. मग नोटांचा कागद विकत घेण्यासाठी आठ दिवसांपूर्वी निविदा का मागवल्या?
- पंजाबमधील निवडणुकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रतिज्ञापत्रात 82 लाखांची रक्कम दाखवली होती. तेव्हा नाही विचारलेत, की यात काळा पैसा किती?
- रिलायन्स जिओ आणि नोट बदलण्यासाठी मोदींनी दिलेली मुदत 30 डिसेंबरपर्यंत आहे, हा योगायोग कसा?
- नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल कोणत्याच मंत्र्यांना माहीत नाही. ही लोकशाही आहे, की हुकूमशाही?

Web Title: Raj Thackeray attacks PM Narendra Modi on demonisation issue