उद्धवकडून नीच दर्जाचे राजकारण: राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

शिवसेनेतून बाहेर पडतानाही बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. त्यावेळी मी पक्ष स्थापन करेन असे वाटत नाही. उद्धव यांच्या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता. याच घाणेरड्या राजकारणामुळे शिवसेना सोडली होती. मला कोणाचा पक्ष फोडून पक्ष उभा करायचा नव्हता. पाच कोटी रुपये देऊन सहा घ्यावेत अशी माझी वृत्ती नाही. पैसे दिल्याचे पुरावे त्यांच्या मुखपत्रातच छापून येतात.

मुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेनेने केलेली फोडाफोडी मी कधीही विसरणार नाही. उद्धव ठाकरे आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून नीच दर्जाचे राजकारण करण्यात आले. आता यापुढे गालावरच टाळी देण्यात येईल, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी शिवसेनेने मनसेच्या सहा नगरसेवकांना आपल्या पक्षात सहभागी करून घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.

राज ठाकरे म्हणाले, की गेल्या दोन दिवसांत झालेल्या प्रकरणात मला बोलावे वाटत नव्हते. शिवसेनेने कसे खालच्या दर्जाचे राजकारण केले हे सर्वांना माहिती आहे. मीच लोक पाठविली आहेत, असे बोलले जात आहे. पण, असे राजकारण कधी केलेले नाही. पाठवायची असती तर सात पाठविली असती, सहा नाही. मी आजपर्यंत असे केलेले नाही आणि करणारही नाही. शिवसेनेतून बाहेर पडतानाही बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. त्यावेळी मी पक्ष स्थापन करेन असे वाटत नाही. उद्धव यांच्या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता. याच घाणेरड्या राजकारणामुळे शिवसेना सोडली होती. मला कोणाचा पक्ष फोडून पक्ष उभा करायचा नव्हता. पाच कोटी रुपये देऊन सहा घ्यावेत अशी माझी वृत्ती नाही. पैसे दिल्याचे पुरावे त्यांच्या मुखपत्रातच छापून येतात. सहा नगरसेवकांना वाचवण्यासाठी 30 कोटी रुपये आणायचे कोठून? पैसे टाकून घाणेरडं राजकारण करणे कधी जमले नाही आणि करणारही नाही. बाळासाहेबांचे नाव घेऊन महापौर बंगला बळकावण्याचे काम यांच्याकडून होत आहे. फोडाफोडीच्या राजकारणाची शिवसेनेकडून मला अपेक्षा नव्हती.

Web Title: Raj Thackeray criticize Uddhav Thackeray