राज्यातील राजकीय वातावरण तापले

MNS
MNS

राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीमुळे मनसे आक्रमक; ठाणे बंदची हाक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या भाजप आमदारांची चौकशी करा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आहे. दरम्यान, मनसेने २२ ऑगस्ट रोजी ‘ठाणे बंद’ची हाक दिली आहे.

या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक राजगड या पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली. यानंतर २२ ऑगस्ट रोजी ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. 

कोहिनूरप्रकरणी चौकशीसाठी ठाकरे यांना २२ ऑगस्टला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मनसेने ठाकरेंना पाठिंबा म्हणून #IsupportRajThackeray हा ट्‌विटरवर ट्रेंड सुरू केला. 

संदीप देशपांडे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे नव्या भारताचे नवीन हिटलर आहेत. जर सरकार सत्याचे असेल, तर पहिले मुंबई बॅंकेत काहीशे कोटींचा गैरव्यवहार करणाऱ्या भाजपच्या आमदारांची चौकशी करा.

ठाकरे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटिशीनंतर राजकारण तापायला सुरवात झाली आहे. मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. येत्या २२ तारखेला राज यांना चौकशीसाठी बोलाविल्यास मनसेने ‘ठाणे बंद’चे आव्हान केले आहे. त्या दिवशी मनसे कार्यकर्त्यांच्या रोषाला समोरे जावे लागेल, असा इशारा मनसेचे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला.

राज यांना ईडीची नोटीस पाठविल्यासंदर्भात काहीही माहिती नाही. दोष नसेल तर कोणीही चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. कायदा हातात घेतला, तर कडक कारवाई करण्यात येईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

२२ तारखेला गरज असेल तरच घराबाहेर पडा. कारण महाराष्ट्राचा गुजरात व्हायला वेळ लागणार नाही.
- अभिजित पानसे, मनसेचे नेते

ईडी किंवा सीबीआय स्वायत्त संस्था आहेत. त्यांचे काम त्यांनी करावे. प्रतिमा स्वच्छ असेल तर चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. 
- संजय राऊत, शिवसेनेचे खासदार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
- नवाब मलिक, ‘राष्ट्रवादी’चे नेते  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com