राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यामध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. 

मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उभय नेत्यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसेचा समावेश होण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल (मंगळवार) राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आता स्वत: राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे. 

मनसेचा आघाडीत होणार समावेश? 

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाआघाडीची काल मंथन बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray meets Sharad Pawar at Mumbai