राज ठाकरे यांचे तूर्तास मौन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कलिना येथील प्रभाग क्रमांक 166 चे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलायचे टाळले.

मुंबई - मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कलिना येथील प्रभाग क्रमांक 166 चे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलायचे टाळले.

"राजाला साथ द्या,' असे आवाहन जनतेला करूनही मनसेला नाशिकसह राज्यातील महापालिका निवडणुकीत दारुण पराभव सहन करावा लागला. निकालानंतर राज यांनी माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले. भाजपच्या पराभूत उमेदवारांकडून मारहाण झालेल्या जखमी मनसे उमेदवारांस भेटल्यानंतर राज ठाकरे हे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते; परंतु त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तूर्तास तरी राज ठाकरे यांनी मौन घेतलेले दिसते.

भाजपचे उमेदवार सुधीर खातू यांच्या समर्थकांनी गुरुवारी (ता. 23) रात्री तुरडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुरडे यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. या हल्ल्याचे पडसाद मुंबईभर उमटले होते. या हल्ल्यानंतर भाजपबाबतही मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. राज ठाकरे यांनी संजय तुरडे आणि कुटुंबीयांची भेट घेतली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे त्यांच्यासोबत होते. तुरडे यांच्या पाठीशी आपण असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील नाशिक, पुणे, मुंबईसह महापालिकांत मनसेच्या पदरी अपयश पडल्यानंतर राज हे "कृष्णकुंज' बाहेर पडल्यामुळे ते आपली प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु नाशिक महापालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिक महापालिकेत सत्तेवर असलेल्या मनसेला केवळ पाच जागांवर यश मिळाले, तर मुंबईत सात, उल्हासनगरमध्ये दोन आणि पुण्यात एक एवढे मनसेचे नगरसेवक निवडून आले आहेत. नाशिक महापालिकेत मनसेने केलेल्या कामाच्या बळावर अन्य महापालिकांत पक्षाला मतदान करावे, असे आवाहन राज यांनी केले होते. परंतु, मनसेला मतदारांनी नाकारले. 227 जागा असलेल्या महापालिकेत शिवसेना किंवा भाजपला बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे मुंबई महापालिकेत मनसे कोणाला साथ देणार याकडे लक्ष लागलेले आहे.

Web Title: raj thackeray not speaking