युतीसाठी राज ठाकरे यांचे आर्जव

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या वातावरणात युती आणि आघाडीच्या चर्चांना सुरवात झाली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वेगळी भूमिका मांडली. युतीबाबत प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की विचार करू, असे महत्त्वाचे विधान त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मात्र, ते स्वतः कुणासोबत युती करण्यास इच्छुक आहेत, हे त्यांनी गुलदस्तात ठेवले.

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या वातावरणात युती आणि आघाडीच्या चर्चांना सुरवात झाली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वेगळी भूमिका मांडली. युतीबाबत प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की विचार करू, असे महत्त्वाचे विधान त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मात्र, ते स्वतः कुणासोबत युती करण्यास इच्छुक आहेत, हे त्यांनी गुलदस्तात ठेवले.

कॉंग्रेससह अन्य पक्षांतील काही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी राज यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) प्रवेश केला. त्या वेळी राज यांनी वरील विधान केले. मनसेची स्थापना केल्यापासून राज यांनी स्वबळावर आगेकूच करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या वक्‍तृत्वाच्या जोरावर राज यांनी विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली होती. 2009च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना लाखाच्या आसपास मते मिळाली होती. त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आल्यावर राज यांचा राजकारणातील दबदबा वाढत गेला.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेला घरघर लागली. आता मुंबई-नाशिकसह अन्य दहा महापालिकांच्या निवडणुका होत असताना राज आणि मनसे "बॅकफूट'वर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज यांनी युतीचा प्रस्ताव अन्य पक्षांसमोर ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज यांच्या पक्षासोबत कोण युती करणार, यावर आता खलबते सुरू झाली आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी
- पक्षस्थापनेपासून आतापर्यंत राज ठाकरे यांचा "एकला चलो रे'चा नारा
- गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपसोबत युती तुटल्यावर शिवसेनेसोबत प्राथमिक स्तरावर युतीबाबत बोलणी; मात्र शिवसेनेकडून अचानक प्रतिसाद थांबविण्यात आला
- काही महिन्यांपूर्वी राज यांची अचानक "मातोश्री' वारी, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेचा तपशील अद्यापि गुलदस्तातच
- अलीकडे राज यांच्या "वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तीन गोपनीय बैठका
- शिवसेना-भाजपचा जागावाटपाचा तिढा न सुटल्यास मनसे एक पर्याय किंवा दबावाचे राजकारण करणार

Web Title: Raj Thackeray planning to Alliance