मुख्यमंत्री कोण होणार, हे मला काय विचारता? : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा की भाजपचा याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीनंतरचा मुख्यमंत्री कोण याबाबत मला काय विचारता ? असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकारांसमोर उपस्थित केला. दक्षिण मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासेविक्रेच्या संदर्भात राज हे आज (सोमवार) मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा की भाजपचा याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. मुंबईत काल झालेल्या राज्य भाजप कार्यकारिणी सभेतही पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल असा दावा केला आहे.

तर तिकडे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे या पदावरून गुगली टाकत आहेत. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आगामी निवडणुकीत युती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मुद्याकडे लक्ष वेधत पत्रकारांनी राज यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही भाष्य न करता मला काय विचारता? असा उलटप्रश्‍न केला. 

दक्षिण मुंबईतील मासेविक्रेत्यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी होईपर्यंत मनसे या प्रश्‍नाचा पाठपुरावा करेल, तसेच त्यांचं पुनर्वसन मुंबईतच जवळपास होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray said that Why do you ask me who will be the next CM