राजसाहेब, रणशिंग फुंकायला कुठं पैसे लागतात!

प्रकाश पाटील 
बुधवार, 11 जानेवारी 2017

कोणतेही सरकार सर्व प्रश्‍न कधीच सोडवू शकत नाही. राज्यात आजही ज्वलंत प्रश्‍न आहेत. त्यासाठी आंदोलन करा, मोर्चे काढा, उपोषणं करा. तुरुंगात जा. चळवळीला बळ द्या. आपोआप लोक राज ठाकरे यांच्या मागे जातील. नुसतेच शब्दांचे प्रहार करून हाती काहीच लागणार नाही. सरकारविरोधात बोटं मोडण्यात काहीच अर्थ नाही. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. पण, ते डोळ्यासमोर उभे राहतात तेव्हा फेसबुकवर पाहिले तर एका क्‍लिकवर त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ येऊन धडाधड आदळतात. भल्याभल्यांचा समाचार घेताना त्यांची रोखठोक भाषणे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहातात. काय पंच असायचा भाषणात.. समोरच्याची बिनपाण्याने करण्यात त्यांचा कोणी हात धरणार नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज भाषण ऐकताना काही वर्षापूर्वी बाळासाहेबांनी केलेली भाषणेही आठवली. त्यावेळी ते जे मुद्दे मांडत होते तेच मुद्दे पुन्हा एकदा राज मांडत आहेत. शिवसेनेच्या वाटेलाही चढउतार आले. पराभव पचविण्याची ताकद त्यांच्यात होती. ते नेहमीच वादळासोबत राहिले. मला सत्ता देऊन बघा ! चमत्कार घडवून दाखवितो. आमच्याकडे पैसे नाहीत, भांडवलदार पक्षांकडे पैसे आहेत अशी टीका ते त्यावेळी करीत. 

राज आज तेच बोलत असले तरी आजच्या नवमतदाराला त्यामध्ये काही इंटरेस्ट आहे असे वाटत नाही. आजच्या तरुणांच्या गरजा पार बदलून गेल्या आहेत. तुमच्या भावनिक आवाहनाला तो प्रतिसाद देईलच असे नाही. त्याला ठोस असे काही तरी लागते. तुम्ही काय केले हे सांगा? असा सवाल तो करतो. नरेंद्र मोदी हे काही तरी करतील असा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर संपूर्ण देशातील तरुणवर्ग त्यांच्यामागे उभा राहिला आणि बलाढ्य कॉंग्रेसची कॉलर धरून सत्तेवरून खाली खेचले. हा गेल्या दोन वर्षांपूर्वीचाच इतिहास आहे. 

विधानसभेनंतर नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांत खरी लढत आहे ती भाजप आणि शिवसेनेतच. जर युती झाली तर सोन्याहून पिवळेच. नाही झाली तर रणांगण गाजणार हे नक्की! या रणांगणात राज ठाकरेंच्या मनसेची कुठे चर्चाच होताना दिसत नाही. गेल्या निवडणुकीत त्यांची बऱ्यापैकी हवा होती. पण ही हवा आता ओसरली. चित्र खूप चांगले दिसत नसल्याने राज हे भाजपवर कडाडून हल्ला करीत आहेत. 'मला सत्ता द्या, देऊन बघा' असे ते मतदारांना आवाहन करतात. पण असे आवाहन आता खूप कोणी गांभीर्याने घेत नाही. गेला तो काळ ! राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मनसे किंवा शिवसेना बहुमताने सत्तेवर येऊही शकत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी किंवा जयललितांची बरोबरी करणारा एकही नेता नाही. विजयश्री खेचून आणण्याची जी धमक बाळासाहेबांमध्ये होती ती आज कोणाकडे दिसत नाही. राजकारणात चढउतार येतातच पण, पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहण्याची गरज आहे. राजकारण हा धंदा झाला आहे हे ही आता नव्याने सांगण्याची गरजच राहिली नाही. शिवसेना, भाजप काय किंवा कॉंग्रेस काय! सर्वच जण पैशावर राजकारण करीत असतात. दहा कार्यकर्ते जरी सांभाळायचे म्हटले तरी खिशात पैसे लागतात. कोणी तुमच्यासाठी फुकट राबायला मोकळे नाही. एक काळ असा होता की लोक उपाशी-तापाशी राहून प्रसंगी वडापाव खाऊन पक्षांसाठी खस्ता खात होते. ते एक तत्त्व घेऊन जगत होते. आज तसे चित्र नाही. सकाळी एका पक्षात असलेला कार्यकर्ता संध्याकाळी कुठल्या पक्षात असेल हे सांगता येत नाही. 

राज बोलतात भारी, पण...! 
राज ठाकरे हे बोलतात भारी.. लोक त्यांचे भाषणही मोठ्या उत्सुकतेने ऐकतात. पण त्यांना साथ देत नाहीत. त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्‍नांना हातही घातला. लोकांनी त्यांचे स्वागतही केले. पण मनसेला ते शेवटपर्यंत टिकविता आले. टोलनाक्‍यांचा प्रश्‍न प्रथम हाती घेतला तो राज यांनीच. श्रेय मात्र लाटले भाजपने. ज्या गोष्टी मनसे करते त्याचे ढोल वाजवत नाही. मार्केटिंग करीत नाही. सोशल मिडीयावरही मागे. आता राज म्हणतात 'ट्विट' आवडत नाही. तुम्हाला नसेल आवडत, परंतु आज त्याची गरज आहे. तुमच्याकडे शेकडो कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर सोपवा ना जबाबदारी. चांगले प्रवक्तेही हवेत तेही दिसत नाहीत. पक्षवाढीसाठी ज्या म्हणून गोष्टी लागतील त्या स्पर्धेच्या राजकारणात कराव्याच लागतील. त्यासाठी भाजपवर टीका करण्यापेक्षा थोडा त्यांचाही आदर्श घ्यायला काय हरकत आहे. नसेल जमत फडणविसांशी, मात्र गडकरींशी तरी बरं आहे ना!

केवळ संताप किंवा चिडण्यापेक्षा सरकारविरोधातील धार तीव्र करण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरायला हवे. कोणतेही सरकार सर्व प्रश्‍न कधीच सोडवू शकत नाही. प्रश्‍न आजही अनेक आहेत. प्रश्‍न कोणते हे सांगण्याची आवश्‍यकता नाही. करा आंदोलन, काढा मोर्चे, करा उपोषण, जा तुरुंगात. चळवळीला बळ द्या. पुन्हा उभारी घ्या. नुसतेच शब्दांचे प्रहार करून हाती काहीच लागणार नाही असे वाटते. लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यास लोक मागे येतील. अन्यथा सरकारविरोधात नुसतीच बोटं मोडण्यात काहीच अर्थ नाही. नाहीतरी रणशिंग फुंकायला तुमच्यासारख्या नेत्याला पैशाची गरज काय?

Web Title: raj thackeray shall not need money to start again