फेकू मोदींचा मुंबई तोडण्याचा डाव : राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव 
. थापा म्हणजेच भाजपा 
. मोदींची जगभरात फेकू अशी प्रतिमा 
. माझ्यासाठी युतीचा विषय संपला 

मुंबई - भारतीय जनता पक्षाचा मुंबई तोडण्याचा डाव हाणून पाडावा यासाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी मी हात पुढे केला होता. मुंबई ही मराठी माणसांची राहावी. मराठी मतांमध्ये दुफळी नसावी, यासाठीच सात वेळा मातोश्रीवर दूरध्वनी केला होता. मराठी माणसांसाठी कुणाचेही पाय चाटण्यास तयार आहे; मात्र मुंबई व मराठी माणूस कोणी तोडत असेल तर तेच पाय छाटण्यासही मागेपुढे पाहणार नाही. अशा आवेशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पालिका निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात मनसेची भूमिका स्पष्ट केली. 

दादर येथे ते बोलत होते. शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न केले यामागची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर त्यांनी सडेतोड हल्लाबोल केला. 

भारतीय जनता पक्षाची सत्ता मुंबईत नको, म्हणून शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न केला, पण मातोश्रीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असे सांगून आता मराठी माणसांनी एकत्र येऊन थापा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. "थापा म्हणजेच भाजपा' अशा शब्दांत राज यांनी टीका केली. 
भारतीय जनता पक्षाच्या डोक्‍यात अनेक गोष्टी वळवळत असून, पहिल्यांदा विदर्भ महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यानंतर मुंबईदेखील महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची खेळी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठीच मुंबई ते अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन सुरू करण्याचे भाजपचे षड्‌यंत्र असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

नोटाबंदीनंतर सर्वाधिक पैसा भाजपकडे कसा आला, असा सवाल करत राज म्हणाले, की आता याच पैशांच्या जोरावर ते निवडणुका लढवतील. पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजप कुठून पैसा आणतो ते आता सर्वांनाच दिसेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 
पारदर्शकता व उत्तम प्रशासन काय असते ते नाशिक महानगरपालिकेचा कारभार पाहून लक्षात घ्या, असे आवाहन करताना मुंबईत भाजप-शिवसेना युतीला जे 25 वर्षांत जमले नाही ते मी नाशिकमध्ये पाच वर्षांत करून दाखवले, असा दावा त्यांनी केला. राज यांनी या वेळी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेला केंद्र व राज्याच्या सत्तेतून बाहेर पडायचे नाही. मुंबईवर त्यांना सत्ता हवी आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र राहून परस्परांवर कठोर टीका करत जनतेची दिशाभूल करत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत ते स्पष्ट झालेच आहे. असा दाखला देत राज यांनी भाजप व शिवसेना यांच्यात मॅच फिक्‍सिंगचा खेळ असल्याची टीका केली. 

शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर बंगल्याची जागा बळकावायची असल्याचा आरोपदेखील राज यांनी केला.

राज म्हणाले..

. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव 
. थापा म्हणजेच भाजपा 
. मोदींची जगभरात फेकू अशी प्रतिमा 
. माझ्यासाठी युतीचा विषय संपला 

Web Title: Raj Thackeray talked about alliance with shiv sena