
Raj Thackeray : "...तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा" ; मशिदीवरील भोंग्यावरून राज यांचा शिंदेंना इशारा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून एकनाश शिंदे सरकारला इशारा दिला आहे. गुढीपाडवा सभेत राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मागच्या सरकारने १७००० महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेकडे आता शिवसेना हे नाव आलं. आमचा विचार बाळासाहेबांचा विचार असल्याचे ते सांगतात. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे की मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या सरकारने माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या.
एकनाथ शिंदे यांना माझं आवाहन आहे की आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता मशिदींवरील भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा. मशिदींवरील भोंगे आम्ही उतरून दाखवू, असा इशारा राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते पाहा. माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका यांना हे दिसंल नाही. ते हटना नाहीतर त्याच्या बाजुला आम्ही गणेश मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे यांनी जावेद अख्तर यांचे कौतूक केले. मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे पण तो मुसलमान जावेद अख्तर ह्यांच्या सारखा मुसलमान हवा. असा मुसलमान पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावून येईल, असे राज ठाकरे म्हणाले.