सहगल यांचे 'मनसे'स्वागत करतो : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

'महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनाचे मराठीपण जपलं जावं' अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे, जी योग्य देखील आहे. पण नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका संमेलनाला येणार असतील, तर त्यांना आमचा विरोध नाही.

- राज ठाकरे

मुंबई : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेनेच रद्द केले. यवतमाळ येथील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सहगल यांना विरोध केला यामुळे आयोजकांची नामुष्की झाली व त्यांनी आमंत्रण रद्द केले. पण या गोंधळात मध्ये पडत 'आमचा सहगल यांना कोणताही विरोध नाही' असे म्हणत राज ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. 

यंदा यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्धाटक म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण सहगल यांना मनसेच्या एका कार्यकर्त्याने विरोध केला असला तरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष या नात्याने माझा त्यांना अजिबात विरोध नाही, असे राज यांनी स्पष्ट केले. 

'महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनाचे मराठीपण जपलं जावं' अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे, जी योग्य देखील आहे. पण नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका संमेलनाला येणार असतील, तर त्यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरूर संमेलनाला यावं, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र सैनिकांनी अशा संवेदनशील विषयांबाबत माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये, असेही म्हटले आहे.

Web Title: Raj Thackeray welcome Nayantara Sehgal for Marathi Sahitya Sammelan