शरद पवार हे खरे स्टेट्‌समन

राजाराम ल. कानतोडे
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबईत 12 मार्च 1993 ला झालेल्या बॉंबस्फोटाच्यावेळी त्यांचा मुत्सद्दीपणा दिसला. त्याची दखल "धीस इज द एक्‍झांपल ऑफ स्टेट्‌समनशीप' अशा शब्दांत मुंबई दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगाने आपल्या अहवालात घेतली आहे.

समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणासह जीवनाच्या विविधांगांना स्पर्श करणाऱ्या विषयांत सतत इतरांच्या पुढे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे खरे स्टेट्‌समन (मुत्सद्दी) आहेत. विरोधक कितीही त्यांच्यावर टीका करीत असले तरी त्यांच्यातला हा पैलू सर्वमान्य आहे. त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप...

पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार यांचा गौरव ही घटना त्या पुरस्काराची उंची वाढविणारी आहे. राजकीय संख्याबळ नसेल त्यांच्याकडे, तरीही देशात आज पंतप्रधान होण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांत त्यांचे नाव असणे ही त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती आहे. अगदी तरुणपणात ठरवून राजकारण करीत या पातळीपर्यंत पोचणे ही सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्राची नस अन्‌ नस माहीत असणाऱ्या या लोकनेत्याचे मुत्सद्दीपण अनेक प्रसंगात दिसले आहे. काळाच्या पुढे चार पावले टाकत समाज आणि देशासाठी आपल्याला काय करता येईल, याचा सतत ध्यास घेतल्यामुळेच सत्ताधारी असो की विरोधक सगळ्यांनाच त्यांच्या मार्गदर्शनाची सतत गरज भासते.

मुंबईत 12 मार्च 1993 ला झालेल्या बॉंबस्फोटाच्यावेळी त्यांचा मुत्सद्दीपणा दिसला. त्याची दखल "धीस इज द एक्‍झांपल ऑफ स्टेट्‌समनशीप' अशा शब्दांत मुंबई दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगाने आपल्या अहवालात घेतली आहे. ती घटना अशी की बाबरी मशीद 1992 मध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या. त्या शमविण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान नरसिंहराव यांनी संरक्षणमंत्री असणाऱ्या शरद पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविले होते. त्यांनी पदाची शपथ घेऊन सहाच दिवस झाले तोच मुंबईत 11 ठिकाणी बॉंबस्फोट झाले. सगळे स्फोट हिंदुबहुल भागात झाले होते. हिंदूंनी पेटून उठत दंगली भडकाव्यात, असा त्यामागे हेतू होता. या स्फोटासाठी वापरलेले आरडीएक्‍स कराचीत तयार झाले होते. अशी स्फोटके त्यावेळी फक्त दोनच ठिकाणी तयार होत होती, एक भारतातील देहू रोडची फॅक्‍टरी आणि पाकमधील कराचीत. देहू रोड फॅक्‍टरीत पवारांनी फोन करून विचारल्यावर गेल्या दोन वर्षांत असा दारूगोळा तयार केला नसल्याचे त्यांना समजले. हा मोठा घातपाताचा डाव असल्यामुळे त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर माहिती देताना स्फोट 11 ऐवजी 12 ठिकाणी झाल्याचे सांगितले. मस्जिद बंदर हे एक मुस्लिमबहुल ठिकाण त्यांनी त्याला जोडले होते. धार्मिक दंगली उसळू नयेत, हा हेतू त्यामागे होता. त्यामुळेच श्रीकृष्ण आयोगानेही त्यांची वाखाणणी केली आहे. 

समाजाला दिशा देण्याचे काम केलेला हा नेता केवळ बोलभांड नाही. ज्या काळात वंशाला दिवा हवाच अशी मानसिकता समाजात होती, त्या काळात एक मुलगी पुरे असे ठरविणारा हा नेता आहे. त्यांनी महिला आरक्षणासह महिला सबलीकरणासाठी केलेले काम सर्वश्रुत आहेच. पण त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च पदावर महिलेला स्थान मिळावे, यासाठी दिलेले योगदानही महत्त्वाचेच आहे. यूपीए एकच्या काळात 2007 मध्ये जी राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली, ती काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर घटकपक्षांसाठी एक कसोटीचा काळ होता. सगळ्या पक्षांचे त्यावर एकमत घडवून आणणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया होती. त्यावेळचे पंतप्रधान मनमोहनसिंग, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, शरद पवार आणि अहमद पटेल हे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या शोधात होते. शिवराज पाटील यांचे नाव त्यावेळी चर्चेत आले. पण त्याला डाव्या पक्षांनी विरोध केला. पुन्हा नावाचा शोध सुरू झाला. प्रतिभाताई पाटील राजस्थानच्या राज्यपाल होत्या. त्या वेळी सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांच्याबरोबरच्या बैठकीत शरद पवार सहज म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर देशाचं राष्ट्रपतिपद एकदाही महिलेने भूषविले नाही.' त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या "बिल्कुल सच !' मनमोहनसिंगांनीही त्याला दुजोरा दिला. डाव्या पक्षांचे या नावावर मत आजमिवण्यासाठी ए. बी. वर्धन यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनीही "वो हमारे अमरावतीकी है!' असे म्हणत पाठिंबा दिला. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही प्रतिभाताईंना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचा घटक पक्ष असताना पाठिंबा दिला होता. या सगळ्या निवडीत पवार यांचे योगदान अनन्यसाधारण होते.

विरोधकांना आपल्या रणनीतीचा थांगपत्ता लागू न देता त्यांच्या पुढे चार पावले राहणे ही शरद पवार यांच्या राजकारणाची खुबी आहे. त्यामुळेच त्यांच्यासारखा सामान्य कुटुंबात जन्मलेला माणूस एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना करून तो चालवू शकतो. अगदी अलीकडच्या काळातील त्यांच्या मुत्सद्दी डावपेचाचे उदाहरण घ्यायचे म्हटले तर महाराष्ट्रातील 2014 च्या विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकाल हाती येण्याआधीच त्यांच्या पक्षाने भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यानंतर असे कसे झाले म्हणून अनेक राजकीय पक्ष आणि विश्‍लेषक कोड्यात पडले. विरोधकांना याचा अर्थ लावता येईना. भाजपने सरकार स्थापन केले. कशीबशी युती झाली. पण या एका डावाने केंद्रस्थानी मात्र शरद पवार राहिले. 

पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करताना अशा या मुत्सद्दी लोकनेत्याला उदंड आयुष्य लाभो, अशी सदिच्छा!!!

(संदर्भ - लोक माझे सांगाती.... राजकीय आत्मकथा - शरद पवार) 

Web Title: Rajaram Kantode write about Sharad Pawar statesmanship