राजेंद्र नागवडे यांच्या मुलास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019


लोणी काळभोर : श्रीगोंदे येथील शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे चिरंजीव पृथ्वीराज व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणावरून 10 ते 15 जणांनी जबर मारहाण केली. पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट नाक्‍यावर शनिवारी (ता. 14) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

लोणी काळभोर : श्रीगोंदे येथील शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे चिरंजीव पृथ्वीराज व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणावरून 10 ते 15 जणांनी जबर मारहाण केली. पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट नाक्‍यावर शनिवारी (ता. 14) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पृथ्वीराज राजेंद्र नागवडे (वय 25, रा. वांगदरी ता. श्रीगोंदे, नगर) यांच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मांजरी बुद्रुक (ता. हवेली) हद्दीतील मांजरी फार्म परिसरातील नीलेश दिवेकर, सागर मुळे, विनोद ढोरे, शुभम हरपळे, महेश डोमाले, विराज हरपळे यांच्यासह दहा अनोळखी तरुणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.

पृथ्वीराज नागवडे व त्यांचे दोन मित्र योगेश भोईटे व मनीष जाधव शनिवारी रात्री आठच्या सुमारास हडपसरहून लोणी काळभोरमार्गे श्रीगोंद्याला जाण्यासाठी चारचाकी दोन वाहनांतून निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी ग्रीन चौकात पृथ्वीराज नागवडे यांच्या वाहनाला नीलेश दिवेकर याची दुचाकी आडवी आली. त्या वेळी पृथ्वीराज यांनी हॉर्न वाजविला. त्याचा राग आल्याने नीलेश दिवेकर याने मोटरसायकल थांबवून, नागवडे यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्याच वेळी मागून आलेल्या योगेश भोईटे व मनीष जाधव या दोन मित्रांनी, नागवडे यांना समजावून वाहनात बसण्याची विनंती केली. नागवडे वाहनात बसत असतानाच नीलेश दिवेकर याने नागवडे यांना, "आमच्या एरियात आम्हाला नडतोस,' असे म्हणत मारहाणीचा प्रयत्न केला.

दिवेकर व नागवडे यांच्यातील वाद पाहून स्थानिक नागरिक जमा झाले. नागवडे निघून गेल्यावर दिवेकर याने काही मित्रांसह त्यांच्या वाहनांचा पाठलाग सुरू केला. कवडीपाट टोल नाक्‍यावर सात ते आठ मोटरसायकलींवरून आलेल्या दहा ते पंधरा जणांनी नागवडे यांच्या वाहनाची मोडतोड केली, तसेच रॉड, पट्टे व लाकडी दांडक्‍याने नागवडे यांना बेदम मारहाण केली. त्यांना जमावाच्या तावडीतून सोडविण्यासाठी आलेल्या योगेश भोईटे व मनीष जाधव यांनाही आरोपींनी धक्काबुक्की केली.

पोलिसांनाही अरेरावीचा प्रयत्न
मारहाणीचा प्रकार लोणी काळभोर पोलिसांना समजताच, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी नागवडे व त्यांच्या दोन मित्रांना जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला; मात्र दिवेकर व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांनाही अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री उशिरा नागवडे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendra Nagvade's son beaten up