शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नगर : "राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक नाही'', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला. 

नगर : "राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक नाही'', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला. 

राजू शेट्टी पुढे म्हणाले, लोकसहभागातून छावणी सुरु केली आहे. त्याला मदत करायचे सोडून येथील लोकप्रतिनिधी छावणीला जाणारे पाणी अडवत आहेत. आता पाणी कोण अडवतो तेच बघतो'', असे सांगून खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. यापुढे जर पाणी अडवले तर राज्यातील शेतकरी येथे उभा करील, असा इशारा त्यांनी दिला.

खोजेवाडी (ता. पाथर्डी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या
कार्यकर्त्यांनी लोकसहभागातून जनावरांची छावणी सुरु केली आहे. ही यंदा सुरु झालेली राज्यातील पहिली छावणी आहे. या छावणीला आज खासदार शेट्टी यांनी भेट देऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे माजी
प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, शिवसंग्राम संघटनेचे नेते डॉ. कृषीराज टकले, संतोष रोहम, प्रताप पटारे, शरद मरकड आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, "दुष्काळ पडला हे सरकारने जाहीर करुन सांगायची गरज नव्हती, सवलती देणार कधी याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. शेतकऱ्यांना आधार देण्याएवजी उद्योगपतीच दुष्काळाच्या नावाखाली लूट करत आहेत. सरकारला अजून
दुष्काळाची दाहकता दिसत नाही. हुंकार ऐकू येत नाही. अन्नदाता लाचार होऊन आधार मागत आहे. लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना संवेदना कळत नाही. ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. सरकारमध्ये शेतकरी हिताची बाजू घेणारे माणसे नाहीत. वाईट वेळ सरकारने शेतकऱ्यांवर आणली आहे. सरकार मदत करेल असे वाटतही नाही. आमच्या कार्यकर्त्यांने कशाचाही विचार न करता लोकसहभागातून छावणी सुरु केली, याचा मला अभिमान आहे. 

भावांनो, घाबरू नका

सरकारने अनुदान दिले नाही तरी भावांनो घाबरु नका, ही छावणी दुष्काळ संपेपर्यत सुरु राहील. या जिल्ह्यामधील साखर कारखानादारांनी शेतकऱ्यांना मदत करण्याएवजी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचा आरोप केला. जिल्हा
बँकेवर मोर्चा काढून स्वत: नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कासार पिंपळगाव येथील नानासाहेब भगत यांनी शेवटपर्यत छावणीला पाणी पुरवण्याची तयारी दर्शवली.

आम्हाला शेट्टीसारख्या माणसाची गरज

राजू शेट्टी यांच्याशी खंडू कोलते, सत्यवान बर्डे आदीसह शेतकऱ्यांनी संवाद साधला. तीव्र दुष्काळ असलेल्या नांदेवली (ता. शिरुर कासार) येथील स्नेहा थिटे या तरुणीनेही भावना व्यक्त केली. "इथल्यापेक्षा शेजारच्या शिरुर कासार, बीड भागात वाईट दुष्काळ आहे. दारात चार जनावरे राहिली नाहीत. आहेत ती जगवणे अवघड आहे. मात्र आमच्या भागात आधार देणारं कोणी नाही. मलाही वाटते अशी छावणी सुरु करुन शेतकऱ्यांना आधार द्यावा, पण माझ्यात तेवढी हिंमत नाही. आमच्या भागाला शेट्टी साहेबांसारख्या माणसाची गरज आहे.''

Web Title: Raju Shetty Criticizes Government on Farmers Issue