पोलिसी खाकीचा शेट्टींना हिसका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलकांना अटक करणे ही कायदेशीर बाब आहे; मात्र अटक करताना एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला अटक करण्याचे काही संकेत असतात. ते पोलिसांनी राजू शेट्टी यांच्या बाबतीत पाळलेले दिसत नाहीत. पोलिसांनी शेट्टी यांच्याशी केलेली वागणूक ही निंदनीयच आहे. 
विनायक मेटे, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष 

मुंबई - "साहेब जरा बिझी आहेत, तुमचेच काम सुरू आहे. आमच्या हातात जादूची छडी नाही,' असा पोलिस ठाण्यातील सर्वसामान्यांचा अनुभव खासदार राजू शेट्टींनाही मंगळवारी आला. शेतमालाला योग्य हमीभाव द्या, या मागणीसाठी त्यांनी विधान भवानासमोरच तूर आणि कांद्याची विक्री सुरू केली होती. या प्रतिकात्मक आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या शेट्टींना जवळपास पाच तास पोलिस ठाण्यात रखडवून ठेवले होते. जमावबंदीसारख्या शुल्लक गुन्ह्यात शेट्टींना अशा स्वरूपाची वागणूक देण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याची चर्चा स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. 

""शेतमालाला भाव मिळण्यासाठी आम्हीच पुढाकार घेऊन विधान भवन परिसरात आठवडे बाजाराची सुरवात केली आहे; मात्र तूर आणि कांदा यासारख्या अनेक पिकांना योग्य भाव न मिळाल्याने ते कवडीमोल दराने विकले जात आहेत. हा माल सडून जाण्याऐवजी लोकांच्या मुखात जावा, म्हणून आम्ही त्याचे सनदशीर मार्गाने वाटप करत होतो. कायदा सुव्यवस्थेला बाधा न आणता सुरू असलेले हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला. या वेळी आम्हाला माध्यमांच्या प्रतिनिधींशीही बोलण्याची संधी पोलिसांनी दिली नाही. त्याचबरोबर पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची पद्धतही चुकीची होती,'' असे राजू शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

""पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर अर्ध्या तासाच्या जामीन प्रक्रियेला पोलिसांनी तब्बल पाच तास लावले. विशेष म्हणजे आम्ही सर्व आंदोलक आणि राजू शेट्टी पोलिस ठाण्यात असताना काही मंत्र्यांचे फोन पोलिसांना आले असल्याचा आमचा संशय आहे. कारण, पोलिस अधिकारी वारंवार फोनवरून या सर्व गोष्टींचा आढावा वरिष्ठांना देत होते,'' असेही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलकांना अटक करणे ही कायदेशीर बाब आहे; मात्र अटक करताना एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला अटक करण्याचे काही संकेत असतात. ते पोलिसांनी राजू शेट्टी यांच्या बाबतीत पाळलेले दिसत नाहीत. पोलिसांनी शेट्टी यांच्याशी केलेली वागणूक ही निंदनीयच आहे. 
विनायक मेटे, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष 

Web Title: raju Shetty police station for five hours